
मुंबई – महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी आणि त्यानंतर लागून आलेल्या दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे दहावी आणि बारावी ऑक्टोबरच्या परीक्षेच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर परीक्षेचे निकाल लांबणीवर!
येत्या १५ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत. यादरम्यान माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयातील १०० टक्के शिक्षक निवडणुकांच्या कामात जुंपणार आहेत. काही दिवसांपूर्वी ३० टक्क्यांहून अधिक शिक्षकांना या कामांसाठी जुंपण्यात आल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. मुख्य म्हणजे, यासंदर्भात राज्य निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे बोर्डाच्या पेपर तपासनीस आणि मॉडरेटर यांना निवडणूक कामांची ड्युटी लावू नये, असे आदेश असूनही १०० टक्के शिक्षकांना ड्युटी जाहीर करण्यात आलेली आहे. ज्याचा सरळ फटका बोर्डाच्या निकालावर आणि पेपर तपासण्याच्या कामकाजावर बसणार आहे.
