
नागपूर – लोकसभा निवडणुकीत विजयाचे श्रेय एका व्यक्तीला दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष टीका करणा-या सरसंघचालक मोहन भागवत यांनी मात्र नरेंद्र मोदी सरकारचे तोंडभरुन कौतुक केले.
युती तुटण्याच्या विषयावर एकशब्दही बोलले नाहीत सरसंघचालक
नरेंद्र मोदी सरकार राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या आघाडीवर चांगले काम करत आहे. त्यांना अजून वेळ द्यायला हवा असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.
विजयादशमीच्या निमित्ताने नागपूरच्या रेशमबाग मैदानावर आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. दरवर्षी विजयादशमीला सरसंघचालक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये स्वयंसेवकांना संबोधित करतात.
शिवसेना-भाजपची २५ वर्षांची युती तुटल्यानंतर सरसंघचालक आज त्याबद्दल काय बोलतात, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संघाच्या स्वयंसेवकांना सक्रीय होण्याची सूचना करणार का ? याकडे सगळयांचे लक्ष लागले होते. मात्र सरसंघचालक मोहन भागवत युती तुटण्याच्या विषयावर एकशब्दही बोलले नाहीत.
भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी मंगळमोहिम यशस्वी करणा-या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. जो पर्यंत देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत सरकारच्या कल्याणकारी योजना, सुरक्षा पोहोचत नाहीत त्याचे समाधान होत नाही तो पर्यंत सरकारचे लक्ष्य पूर्ण झाले असे म्हणता येणार नाही.
