मुंबई सोडणार नाही गुजराती व्यावसायिक

mumbai
मुंबई – ‘गुजरात लडायक मंचा’चे अध्यक्ष रमेश जोशी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल किंवा साक्षात मोदी यांनीही सांगितले तरी कोणीही उद्योजक किंवा व्यापारी मुंबई सोडून गुजरातला जाणार नाही, असा दावा जाहीर पत्रकाद्वारे केला आहे.

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी इंडियन र्मचट चेंबरच्या कार्यक्रमात नुकतेच मुंबईतील वाहतूक व्यवस्था भयावह असून, मुंबईतील गुजराती उद्योगपतींनी गुजरातला यावे, असे विधान केले होते. मात्र, त्यांच्या या टिप्पणीविरोधात गुजराती समाजात असंतोष व्यक्त केला जात असल्याचे मत जोशी यांनी मांडले.

लाखो गुजराती बांधवांना रोजी-रोटी, निवारा, धन, वैभव, किर्ती, सुरक्षितता मुंबईतच लाभली आहे. गुजरात आमची जन्मभूमी आहे, पण मुंबई आणि महाराष्ट्राची भूमी ही गुजराती व्यापारी व नोकदार वर्गासाठी अन्नदाता आहे. मुंबईत गुजराती समाजाला मिळालेल्या रोजगार, उद्योगामुळेच गुजरातमध्ये आजही लाखो घरांमध्ये चुली पेटतात, अशी माहिती जोशी यांनी दिली.

मुंबईसह महाराष्ट्रातील जनतेने गुजराती बांधवांविषयी प्रेम व बंधुभाव दाखवला आहे. मुंबईतील गुजरातवासीय महाराष्ट्राप्रती कायम कृतज्ञ असून, मुंबईसह महाराष्ट्र सोडण्याचा विचार ते करूच शकत नाही, असा दावाही जोशी यांनी केला.