
मुंबई : आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपने इतर राज्यांमध्ये केलेल्या युत्या का तुटल्या याचा विचार करा आणि मग महाराष्ट्रातील युती का तुटली याचे निष्कर्ष काढा, असा खोचक टोला दिला.
मोदींची लाट असेल, सभांची गरज काय? – उद्धव ठाकरे
युती का तुटली याचे कोडे आपल्याला उलगडत नाही. भाजपने हिंदुत्त्वाचे नाते का तोडले, मला याचे उत्तर हवे आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मंत्रिपदाबाबतही यू टर्न घेतला. मंत्रिपद सोडायचे की नाही याचा विचारही महायुतीमध्ये असलेल्या घटकपक्षांशी चर्चेनंतरच घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माझे आणि नरेंद्र मोदींशी चांगलेच संबंध आहेत. मी अजूनही त्यांना नरेंद्र भाई बोलतो. पण राज्यात नरेंद्र मोदी यांची लाट असेल तर एवढ्या सभांची गरजच काय असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला.
राजच्या प्रकृतीची चौकशी केली तर इतरांची तब्येत का बिघडावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाय प्रकृतीच्या विचारणा करण्यासाठी राज ठाकरेंना फोन केल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला.
यंदा शिवसेनेचे दसरा मेळावा हा राजकीय नाही तर पारंपरिक असेल असंही उद्धव यांनी स्पष्ट केल्यामुळे शिवाजी पार्कात यंदा शिवसेनेचा राजकीय आवाज घुमणार नाही. केवळ शस्त्रपूजन करून शिवसेनेची बोरिवलीत सभा होणार आहे.
