
न्यूयॉर्क – पुन्हा एकदा भारतीय मुस्लिमांबद्दल अमेरिका दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय मुस्लिम अलकायदाला कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत असा विश्वास काऊंसिल फॉर फॉरेन रिलेशन्स या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या मोदींनी एका प्रश्नावर व्यक्त केला.
अलकायदाला भारतीय मुस्लिम कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत – मोदी
एका खासगी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने विचारलेल्या अलकायदापासून भारताला धोका आहे ? या प्रश्नावर मोदींनी हे उत्तर दिले. भारत ही बुद्ध, महात्मा गांधींची भूमी आहे. अहिंसा हे आमचे मुख्य तत्वज्ञान आहे. भारतीयांचा या तत्वज्ञानावर विश्वास आहे त्यामुळे दहशतवादाला भारतात थारा मिळणार नाही असे मोदींनी सांगितले.
दहशतवादाला सीमा नसून, दहशतवाद्यांमध्ये चांगले किंवा वाईट असा फरक करता येत नाही. दहशतवाद हा दहशतवादच असतो. दहशतवाद एक जागतिक समस्या असून, दहशतवादाला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रभाविपणे काम करणे आवश्यक असल्याचे मोदी म्हणाले.
