
न्युयॉर्क : आमचीही मनापासून इच्छा आहे कि भारताचे पाकिस्तानसोबत सलोख्याचे संबंध असावेत. त्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्याची आमची पूर्ण तयारी आहे. मात्र ती चर्चा शांततापूर्ण वातावरणात व्हायला हवी. मात्र, दहशतवादाच्या सावटाखाली अशी चर्चा होणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकला खडे बोल सुनावले.
शांततापूर्ण वातावरणात पाकसोबत चर्चा : पंतप्रधान मोदी
अमेरिकेत संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या हिंदीतील भाषणात भारताची बाजू आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सडेतोडपणे मांडली. पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शुक्रवारी त्यांच्या भाषणात काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून, काश्मीरला भारतात रहायचे आहे की नाही, यावर सार्वमत घ्या, या मागणीचे तुणतुणे वाजवले होते. मोदी यांनी त्याचा थेट उल्लेख आपल्या भाषणात न करताही शरीफ यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. ’आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अशा प्रकारच्या मुद्द्यांचा उल्लेख करणे हा द्वीपक्षीय प्रश्न सोडवण्याचा योग्य मार्ग नव्हे’, असे त्यांनी शरीफ यांना सुनावले.
दहशतवाद हा संपूर्ण जगासाठी मोठे संकट बनले आहे, असे सांगत दहशतवादाच्या नायनाटासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठी ठोस आंतरराष्ट्रीय कायदे करण्याची गरज असल्याचे मतही मोदींनी यावेळी व्यक्त केले.
