हवेत विरली राज ठाकरेंची घोषणा !

raj
मुंबई – लोकसभा निवडणूकीतील दारूण पराभवानंतर आपण स्वतः विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी केली होती आणि राज ठाकरेंची ही घोषणा हवेतच विरली आहे.

राज यांनी आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही आपली उमेदवारी दाखल केलेली नसल्यामुळे राज यांनी जाहीररित्या केलेली घोषणा ही घोषणाच राहिली आहे. मनसेप्रमुखांनी केलेल्या या घोषणेने चांगलीच खळबळ माजली होती.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेच राज ठाकरे हे मराठवाड्यातील उमेदवारांच्या मुलाखतीसाठी औरंगाबादला रवाना झाले होते. मात्र तेथेच त्यांची प्रकृती बिघडल्याने ते मुंबईला परतले. त्यानंतर जवळपास ८/१० दिवस राज यांचे जाहीर दर्शनच नव्हते.

२५ सप्टेंबरला, मुंबईत षण्णमुखानंदमध्ये ब्लु-प्रिंटच्या सादरीकरणाच्या कार्य़क्रमातही सुरूवातीलाच राज यांनी राजकीय घोषणा होणार नसल्याचे सांगून टाकले. त्यामुळे दोन दिवस राज ठाकरे कोणत्या मतदारसंघातून उभे राहणार याची उत्सुकता चांगलीच ताणली गेली होती.

परंतू, ऐनवेळी तुटलेली युती, आणि मोडलेली आघाडी यादरम्यान उमेदवारी मिळण्यावरून अनेक इच्छुकांनी मारलेल्या कोलांटउड्या यातच हे ४८ तास संपलेही आणि राज ठाकरेनी आपली उमेदवारी ना जाहीर केली, ना फॉर्म भरला !

‘या मला आपल्याशी काही बोलायचे आहे, अशी भावनिक साद घालत राज यांनी लोकसभा निवडणूकीतील दारूण पराभवानंतर एक मोठी सभा मुंबईत घेतली.

या सभेत खुद्द राज ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार असे जाहीर करून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जान फुंकली, मात्र राज यांनी निवडणूकीत उतरणे टाळल्याचेच दिसत आहे.