
पुणे – मान्सूनच्या पावसाने परतीचा प्रवास प.राजस्थान आणि कच्छ भागातून सुरू केला असून मंगळवारी तो राजस्थान आणि कच्छमधून बाहेर पडला आहे. दरवर्षी हा परतीचा प्रवास १ सप्टेंबरपासून सुरू होतो तो यंदा तब्बल २३ दिवस उशीरा सुरू झाला आहे. गतवर्षी तो ९ सप्टेंबरला सुरू झाला होता तर २००८ साली तो सर्वात उशीरा म्हणजे २९ सप्टेंबरला सुरू झाला होता असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू
यंदा केरळात मान्सून ६ जूनला आला होता तर महाराष्ट्रात तो ११ जूनला पोहोचला होता. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली होती. महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सर्वसाधारणपणे १ आक्टोबरला सुरू होतो व १५ आक्टोबरपर्यंत तो महाराष्ट्रातून पूर्णपणे माघारी जातो. यंदा मुळातच राजस्थानातून तो बाहेर पडण्यास उशीर झाल्यामुळे यंदा ऐन दिवाळीतही महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचेही सांगितले जात आहे.
