वाहनांच्या विक्रीतील दलाल

broker
चांगली प्राप्ती करून देणारा आणि भरपूर मागणी असलेला उद्योग म्हणून वाहनांची विक्री करण्याची दलाली हिचा उल्लेख करता येईल. या व्यवसायामध्ये भरपूर संधी आहे आणि तो व्यवसाय करणारे खूप लोक हजारो रुपये कमवत आहेत. लोकांना सध्या गाड्यांची फार गरज भासत आहे आणि बाजारात निरनिराळ्या प्रकारची वाहने उपलब्ध होत असल्यामुळे लोक वाहने खरेदीही करत आहेत आणि अदलाबदलही मोठ्या प्रमाणावर करत आहेत. बाजारात नित्य नवे मॉडेल येत असते. मोपेड, बाईकस् आणि कार यांच्या मॉडेलांना तर काही मर्यादाच नाही. भरपूर नव नवे मॉडेल्स् यायला लागले की, लोकांना जुन्या मॉडेलचा कंटाळा येतो आणि ते केवळ हौस म्हणून जुन्या मॉडेलची गाडी टाकून देऊन नवे मॉडेल खरेदी करण्याच्या मागे लागतात. विशेषत: मोटारसायकलींमध्ये ही प्रवृत्ती फार आहे. मात्र अशा देवाणघेवाणीमध्ये कोणी तरी दलाल गुंतलेला असतोच आणि तो जुन्या मॉडेलची खरेदी करतो आणि ते नव्या ग्राहकाला विकूनही देतो. कारण जुनी गाडी विकण्यास इच्छुक असणार्‍यांची माहिती त्याला असते आणि सेकंड हॅन्ड वाहन खरेदी करण्यास उत्सुक असणारे लोकही त्यालाच भेटत असतात.

म्हणजे फॅशन म्हणून वाहने बदलणारे लोक आणि जुन्या गाड्या घेण्यास उत्सुक असलेले लोक यांच्यातला तो दुवा असतो आणि तसा तो असल्यामुळेच त्याला चांगली मागणी असते. या व्यवसायामध्ये निव्वळ दलाली केली तर याची गाडी त्याला आणि त्याची गाडी याला विकून देण्यामुळे मिळणारे कमिशन त्याला मिळते. तेही काही कमी नसते. साधारणत: एका मोटारसायकलमागे ते विकणार्‍यांकडून पाचशे रुपये आणि खरेदी करणार्‍यांकडून पाचशे रुपये असे हजार रुपयांपर्यंत जाते. तेही काही कमी नाही. त्यासाठी जागा लागते ही गोष्ट खरी आहे, पण महाराष्ट्रातल्या बहुतेक मोठ्या गावांमध्ये म्हणजे साधारण एक लाख वस्ती असलेल्या गावांमध्ये असे जुन्या वाहनांचे बाजार नित्यच भरायला लागले आहेत. रस्त्याच्या कडेला कुठे तरी गावाच्या बाहेर वाहने येऊन उभी राहतात आणि बघता बघता त्याला बाजाराचे स्वरूप येते. त्या बाजारात उतरून कोणीही बोलका होतकरू तरुण आपण दलाल असल्याचे जाहीर करू शकतो आणि दलाली करून चांगला पैसा मिळवू शकतो. जागेसाठी त्याला काहीच करावे लागत नाही. काही वेळा गावाच्या आत मोक्याच्या ठिकाणावर असे बाजार भरलेले असतात. तिथे जागेला भाडेही लावले जाते, परंतु एकदा जागेची जबाबदारी पार पडली आणि तेवढ्यापुरते भाडे दिले की बाकी कसलीच गुंतवणूक दलालास करावे लागत नाही.

थोड्या मोठ्या शहरामध्ये असा मोटारकारचा बाजार भरवला जातो आणि तिथे कारची देवाण-घेवाण करण्यामध्ये यापेक्षाही अधिक उत्पन्न दलाल मिळवू शकतो. या व्यवहारामध्ये काही वेळा किंबहुना बहुतेक वेळा नावाच्या मालकीची आदलाबदल करणारी कागदपत्रे दलालच हाताळतात आणि दलालांना त्यासाठी आर.टी.ओ. खात्यामध्ये संबंध प्रस्थापित करावे लागतात. ते केले की, तिथले काम सोपे होते आणि ते काम करून दिल्याबद्दलची फी सुद्धा हे लोक आकारतात. अर्थात हा सारा व्यवहार कायदेशीर करण्यासाठी कागदपत्रे उपलब्ध असणार्‍या अधिकृत मालकीच्या वाहनांचाच व्यवहार केलेला बरा असतो. या व्यवहारामध्ये आणखी एक धाडस केल्यास जास्त कमाईची शक्यता असते. साधारणत: वाहनांच्या व्यवहारातील दलाल फक्त विक्रीच्या आणि खरेदीच्या व्यवहारात फक्त दलाली मिळवू शकतात. चार चाकी वाहनांमध्ये ही दलाली साधारण पाच हजार रुपयांपर्यंत सुद्धा असू शकते. परंतु विक्रीला आलेली जुनी गाडी स्वत:च खरेदी करून ती नंतर महागाने विकली तर त्या विक्रीत त्या वाहनाला येणारी जादा किंमत ही दलालास मिळू शकते आणि ती वाहनाच्या किंमतीवर अवलंबून असते.

काही काही दलाल जुन्या गाड्या खरेदी करून त्यात बरीच दुरुस्ती करून आणि सजावट करून नंतर विकून टाकतात. अशा व्यवहारामध्ये त्या दलालास वाहनामागे पन्नास हजारांपासून एक लाखापर्यंत कमाई सहज होऊ शकते. मात्र अशा खरेदी-विक्रीला त्याच्या स्वत:च्या जवळ भांडवल असले पाहिजे. काही दलाल केवळ संबंधाच्या जोरावर भांडवल न गुंतवता असा व्यवहार करू शकतात. घेतलेले वाहन उधारीने खरेदी करून ते विक्री करून नंतर मूळ मालकाचे पैसे दिले तर चालते. अशा व्यवहारात पदरी भांडवल नसतानाही लाखापर्यंतची कमाई दलालास मिळवता येऊ शकते. एकंदरीत हा व्यवसाय केवळ शब्दांवर चालणारा आणि आपले अजिबात भांडवल गुंतलेले नसणारा असा आहे. बोलण्याची ढब, प्रामाणिकपणा, सचोटी आणि लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याची हातोटी तसेच विश्‍वासार्हता असेल तर या क्षेत्रात कोणालाही उतरता येईल. तालुका पातळीवरच्या गावांमध्ये सुद्धा असे बाजार भरायला लागले आहेत. चांगला धडपड करणारा दलाल अशा व्यवहारातून महिन्याला किमान ४० ते ५० हजार रुपये एवढी कमाई करू शकतो.

Leave a Comment