
मुंबई – भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या २५ वर्षांची युती कायम राहावी यासाठी भाजपचा प्रयत्न असल्याचे सांगितले असून शिवसेनेकडे जागावाटपाबाबत ५९ जागांसह अन्य जागांबाबतचा एक प्रस्ताव पाठवणार आहोत. तसेच महायुती कायम रहावी याबाबत आजच्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत एकमत झाल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
भाजपनेच आजवर सामंजस्याची भूमिका घेतली – मुनगंटीवार
शिवसेनेने देऊ केलेल्या ११९ जागांबाबतची माहिती आम्हाला सूत्रांकडूनच मिळाल्याचे मुनगंटीवार म्हणाले. पण हा जुना फॉर्म्युला आहे. मात्र आजपर्यंत ज्या ५९ जागांवर शिवसेना जिंकलीच नाही, त्या जागा आणि भाजप ज्या १९ जागांवर नेहमी हरलेली आहे, त्या जागांबाबत विचार होणे गरजेचे असल्याचे मुनगंटीवारांनी सांगितले. कारण आजवर भाजपनेच सामंजस्याची भूमिका घेतली आहे.
या सर्व जागांबाबत पुनर्विचार होणे गरजेचे असल्यामुळे त्याबाबतचा प्रस्ताव शिवसेनेकडे पाठवणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
