
मुंबई – गेली २५ वर्ष राज्यात अभेद्य असलेली शिवसेना – भाजप युती आज अखेर संपुष्टात आली. भाजपची १३० जागांची मागणी शिवसेनेने धुडकावून लावत ११९ जागा देण्याचीच तयारी दर्शविली होती . ” मातोश्री ” वर आज सकाळी झालेल्या बैठकीत युती तोडण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले . याबाबतची अधिकृत घोषणा आज काही वेळातच होणार आहे.
शिवसेना – भाजपचा अखेर ” घटस्फोट “
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या कोअर कमिटीची सकाळी ११ वाजता मुंबईत जागावाटपासंदर्भात अंतिम बैठक होणार आहे. त्यानंतर युती तोडल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. अमित शहा काल रात्री पुण्यात मुक्कामी होते. आज सकाळी ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. अमित शहांनी यांनी भाजपमधील कोअर कमिटीतील सदस्यांशी चर्चा केली आहे. त्यानुसार स्वतंत्र लढविण्याचा निर्णय झाल्याचे कळते. मात्र, अधिकृत घोषणा होण्यास काही अवधी लागणार आहे. भाजपची कोअर कमिटी पक्षाध्यक्ष अमित शहांना तुटी तोडण्याबाबत प्रस्ताव देईल. त्यानंतर पक्षाध्यक्ष शहा हा निर्णय पार्लमेंटरी बोर्डापुढे ठेवतील. त्यांची मंजूरी मिळाल्यानंतर याबाबतची घोषणा होणार असल्याचे कळते. त्यासाठी आज सायंकाळपर्यंत वेळ जाऊ शकते.
दरम्यान, शिवसेनेने आपल्या कोट्यातील २१ जागा भाजप व मित्रपक्षांना देऊ केल्यानंतर भाजपला मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठीच अधिक जागा हवा आहेत. त्यामुळे भाजपने युती तोडल्यास त्याचा त्यांना जबर किंमत मोजावी लागेल, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. युती तुटल्यास भाजपचा इतिहास पाहता मराठी जनता मोदी-शहा या जोडीऐवजी बाळासाहेब ठाकरेंच्या वलयामुळे सेनेला व ग्रामीण भागातील पारंपारिक मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीला पसंती देऊ शकतात असेही तज्ज्ञांनी मत मांडले आहे.
भाजपने १३५ जागा हव्याच, असा अट्टाहास ठेवल्याने जागावाटपाचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. शिवसेनेने आपल्या १७१ जागांपैकी २१ जागा भाजप व महायुतीतील घटकपक्षांना देऊ केल्या आहेत. तरीही भाजप मित्रपक्षांच्या जागा सोडून १३५ जागा हव्यात याच मागणीवर ठाम आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे गुरुवारपासून महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत.
