
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत पण त्यानिमित्ताने विविध राजकीय पक्षांची म्हणावी तशी तयारी झालेली नाही. तशा काहींनी हालचाली केल्या आहेत पण निवडणुका जाहीर झाल्याबरोबर लगेच होऊनही जातील त्या मानाने तयारी काहीच नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे कल्याण केल्याचे मोठे दावे तर करीत आहेतच पण यापुढेही राज्याला चांगले सरकार देण्याची अभिवचने देत आहेत. पण त्यात किती खोटेपणा आहे आणि त्यांची चांगले सरकार देण्याची किती ताकद आहे याचे दर्शन अजूनही होत आहे. त्यांनी एस.टी. महामंडळावर तीन कॉंग्रेस कार्यकर्त्यांची नेमणूक केली आहे. शनिवारी रात्री नऊ वाजता त्यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली. हा आदेश भारीच अर्जंट आहे. कारण पक्ष पंधरवडा सुरू होण्याच्या आत त्या कार्यकर्त्यांना त्यांच्या नियुक्तीचे आदेश जाऊन पोचले पाहिजेत. अर्थात एवढ्या तातडीने निघालेल्या या आदेशाची प्रतीक्षा मात्र गेली पाच वर्षे होत होती. राज्यातल्या विविध महामंडळावरच्या अशासकीय नियुक्त्या लवकरात लवकर कराव्यात असा तगादा पक्षाकडून सुरू होता. या सदस्यांना आता नेमले जात आहे. त्यांना जे काही बरे वाईट काम करण्याची संधी किंवा मिरवण्याची हौस निदान गेली पाच वर्षे तरी भागवून घेता आली असती ती आता पाच दिवसही मिळणार नाही. त्यांना हा आदेश मिळेल त्यानंतरच्या फार तर काही तासांनी निवडणुकीची आचार संहिता लागू होईल आणि तिच्यानुसार त्यांच्या हातातल्या सार्या सोयी काढून घेतल्या जातील.
शिवसेनाचा इ वचननामा
असा हा तातडीचा कार्यक्षम कारभार सत्ताधारी पक्षाने हाती घेतला आहेे.दुसर्या बाजूला शिवसेनेने तातडीने कामे करणारे व्हिजन डॉक्युमेंट सादर केले आहे. शिवसेनेचे व्हिजन डॉक्युमेंट आणि मनसेचा ब्ल्यू प्रिंट यांची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा सुरू असेल. या दोघांनाही कोणी या गोष्टींची मागणी केली नव्हती. राज ठाकरे यांनी स्वत:च आपल्याकडे महाराष्ट्राच्या विकासाचा ब्ल्यू प्रिंट असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या हातात नाशिक महानगरपालिका असतानाही त्यांना नाशिक शहराच्या कारभारात आपल्या भाषणातल्या तडफेचा शतांशही प्रतिबिंबित करता आला नसल्याने लोक त्यांच्याविषयी संशय व्यक्त करायला लागले होते. त्यांना उत्तर देताना त्यांनी आपल्या हातात ब्ल्यू प्रिंट असल्याचा दावा केला होता. मात्र लोक खरोखरच तसा काही प्रिंट आपल्याला मागतील असे त्यांना वाटले नव्हते. मागितलाही नसता पण त्यांनी स्वत:ला महाराष्ट्राचा नरेन्द्र मोदी संबोधायला सुरूवात केली तेव्हा लोकांनी त्यांच्या महाराष्ट्राच्या विकासाच्या कल्पना काय आहेत हे समजावून घेण्याचा गंभीर प्रयत्न सुरू केला.
खरे तर ज्याच्या मनात सातत्याने असे चिेंतन सुरू असते तो असले कसलेही भारी शब्द न वापरता आपल्या मनातले संकल्प सहज बोलून दाखवू शकतो. निरनिराळ्या समस्या समोर येतात तेव्हा त्या आपापत:च प्रकट होत असतात पण तसे राज ठाकरे यांच्या बाबतीत चुकूनही होईनासे झाले. त्यांचीही पंचाईत झाली. आता त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे व्हिजन डॉक्युमेंट आले आहे. त्या बाबत राज ठाकरे यांनी चालढकल केली. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आधी आपले डॉक्युमेंट जारी केले. त्यांचीही अवस्था थोड्याबहुत फरकाने अशीच होती कारण शिवसेनेला पूर्वी निवडणुकीच्या आधी काही सांगणेच मान्य नव्हते. कै. बाळासाहेब ठाकरे तर जाहीरनामा या कल्पनेचीच थट्टा करायचे. शेवटी ते आवश्यक आहे असे दिसायला लागल्यावर त्यांनी तो काढला पण त्यातही आपली हुशारी दाखवली. लोक जाहीरनामे काढतात पण त्यानुसार वागत नाहीत, त्यातली आश्वासने पुरी करीत नाहीत, आपण जे काही काढू त्यानुसार वागून दाखवणार आहोत म्हणून त्याला जाहीरनामा न म्हणता वचननामा म्हणू असे म्हणत त्यांनी वचननामे काढायला सुरूवात केली. त्यांनी काढलेल्या नाम्यातली वचने पाळली की नाही हे पहाण्यासाठी शिवसेनेच्या हातात सत्ता यायला हवी होती पण तसा काही योगच आला नाही. आता मात्र उद्धव ठाकरे यांना हातात सत्ता येण्याची एवढी खात्री आहे की ते आपले हे वचननामा कम व्हिजन डॉक्युमेंट सादर करताना ती खात्री व्यक्त करीत आहेत.
असे वचननामे प्रसिद्ध करताना ते प्रसिद्ध करणारे राजकीय पक्ष, आमच्या हाती सत्ता आली तर….. अशी प्रस्तावना करून पुढची आश्वासने देतात किंवा आपले बेत मांडतात पण उद्धव ठाकरे यांनी आपल्या व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन करताना, आम्ही सत्तेवर येणारच आहोत आणि असे करणार आहोत असे छातीठोकपणे सांगायला सुरूवात केली आहे. त्यांचा हा विश्वास सत्यात उतरावा अशी शुभेच्छा आपण देऊ यात पण त्यांनी आपले व्हिजन डॉक्युमेंट सादर करताना ते आन लाईन सादर करण्याची जी कल्पकता दाखवली आहे ती कौतुकास्पद आहे. आपल्या सत्तेत राज्यातले जास्तीत जास्त कारभार ऑन लाईन असतील. मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी इ लर्निंगची सोय पुरविली जाईल आणि त्यासाठी मुलांना खिशात बसेल असे ई दप्तर दिले जाईल असे त्यांनी जाहीर केले आहे. राज्यात चांगल्या शिक्षकांची वानवा आहे. पण राज्यात खरोखरच शिवसेनेने प्रस्तावित केलेली इ लर्निंगची सोय झाली तर शाळेतही न जाता मुलांना मोदी गुरुजींच्या शाळेप्रमाणे आपल्या घरातही बसून पुण्याच्या किंवा मुंबईच्या एखाद्या अनुभवी शिक्षकाकडून धडा घेता येईल. योजना चांगली आहे.
