आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडियाची घसरण

icc
दुबई – टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-३ ने मात खाल्ल्याने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत घसरण झाली आहे.

४० वर्षांनी पहिल्यांदा भारताला ओव्हल कसोटीत एक डाव आणि २४४ धावांनी पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताची या क्रमवारीत पाचव्या स्थानी घसरण झाली असून मालिका जिंकणा-या इंग्लंड संघाने चार गुण कमवत क्रमवारीत तिस-या स्थानावर झेप घेतली आहे.

श्रीलंकेने पाकिस्तानविरुद्धची मालिका २-० ने विजय मिळवल्यामुळे श्रीलंका चौथ्या स्थानी आला आहे. या क्रमवारीत दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया केवळ एका गुणाने पिछाडीवर असल्याने दुस-या स्थानी आहे.

फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत पहिल्या २० मध्ये केवळ भारताच्या चेतेश्वर पुजाराचे स्थान कायम आहे. तो १६ व्या स्थानी आहे. तर मालिकेत दमदार कामगिरी करणारा ज्यो रुट पहिल्यांदाच आपल्या कारकिर्दीत पहिल्या १० मध्ये स्थान मिळवले आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा आर.अश्विन १३ व्या, प्रग्यान ओझा १५ व्या तर इशांत शर्मा २० व्या स्थानी आहे. तर कसोटीतील अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अश्विनच्या स्थानात घसरण झाली असून तो दुस-या स्थानावर आहे.