
गडचिरोली – गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या माओवाद्यांच्या हिंसाचारांनी ग्रस्त असलेल्या जिल्ह्यात गेल्या तीन दशकात ४९३ जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
माओवाद्यांच्या हिंसाचारात ४९३ बळी
माओवाद्यांनी १९८०च्या दशकात या तीन जिल्ह्यांमध्ये आपल्या हिंसक कारवाया सुरु केल्या होत्या. माओवाद्यांच्या या हिंसाचारासंदर्भात राज्य नक्षलवाद विरोधी पथकाने शनिवारी माहिती प्रसिद्ध केली. फेब्रुवारी १९८५ ते जुलै २०१४ या कालावधीमध्ये गडचिरोली जिल्ह्यात ४५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर याच कालावधीमध्ये गोंदीयात ३३ आणि चंद्रपुरमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कालावधीमध्ये माओवाद्यांनी सामान्य नागरिकांसह पोलिसांना माहिती देणा-यांवर सुद्धा हल्ले केले. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे कर्मचारी, सरकारी अधिका-यांची माओवाद्यांनी हत्या केली आहे.
या तीन दशकांमध्ये माओवाद्यांनी पोलिसांना माहिती देणा-या २०६ जणांचा, १८८ सामान्य नागरिक, २४ पोलिस पाटील, दहा सरपंच, पाच माजी पोलिस पाटील आणि अन्य १४ जणांची हत्या केली आहे.
