मृतांची संख्या 82 वर : बचावकार्यात पाऊस, चिखल आणि दुर्गंधीमुळे अडथळे

malin
पुणे : आज चार दिवस माळीण दुर्घटनेला उलटले असून मृतांचा आकडा 82 वर पोहचला आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही 100 जण दबल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज दुर्घटनास्थळाला राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील आणि काँगेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी भेट देऊन, बचावकार्याची पाहणी केली.

या गावातील 167 घरांपैकी एकूण 44 घरे मलब्याखाली गाडली गेली असून चार दिवसापासून अविरत एनडीआरएफचे जवान, तीन जेसीबी यंत्र आणि 50 ऍम्ब्युलन्सच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. यात माळीण गावच्या शेजारील गावेही मदतकार्यात गुंतले आहेत. गावातीलच स्मशानभूमीत मृतांवर सामुहिक अंत्यसंस्कार केले जात असून, पावसाची संततधार, चिखल आणि दुर्गंधी यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, माळीण गावातील वीजपुवठा पुर्ववत करण्यास महावितरणला यश आले आहे.

निसर्गाच्या अवकृपेतून बचावलेल्यांना राहण्यासाठी अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत असून ढिगाऱ्याखाली गाडलेले मृतदेह आणि मेलेली जनावरे यांमुळे परिसरात दुर्गंधी पसरु लागली असून घटनास्थळाला भेट देणाऱ्या व्हीआयपी आणि लोकांची गर्दी कमी होताना दिसत नाही.

दरम्यान, माळीणवासिवांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत असून, अनेक गणेश मंडळे, मुंबईचे डबेवाले, सामाजिक संस्था, महाविद्यालये आणि विविध स्तरातून पैसे आणि अन्नधान्याची मदत होत आहे. पिडित कुटुंबाला केंद्र सरकारची 2 लाख तर राज्य सरकारची 5 लाख रुपयाची मदत जाहीर झाली आहे.

Leave a Comment