
मुंबई – संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इंग्लंडविरुद्ध होणा-या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड 7 ऑगस्ट रोजी निवड समिती करणार आहे. एकदिवसीय मालिका पाच सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर होणार आहे.
7 ऑगस्टला एकदिवसीय संघाची निवड
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकदिवसीय मालिका व एकमेव टी-20 सामन्यासाठी संघनिवड करण्याकरिता निवड समितीची बैठक 7 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता होणार आहे. सध्या मालिकेतील तीन सामने भारतीय कसोटी संघाने पूर्ण केले असून दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. मँचेस्टरमध्ये चौथा सामना 7 ऑगस्ट रोजीच सुरू होणार असून याच दिवशी एकदिवसीय संघनिवड केली जाणार आहे. पुढील वर्षीच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये वनडे विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये होणार आहे. ही स्पर्धा विचारात घेऊनच इंग्लंडमधील मालिकेसाठी खेळाडूंची निवड होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी निवड समितीच्या रडारवर कोणते खेळाडू आहेत हे समजणार आहे. भारत या स्पर्धेचा विद्यमान विजेता असून जेतेपद स्वतःकडेच राखण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
