
डार्विन – केदार जाधव आणि सॅमसन यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर येथे सुरू असलेल्या चौरंगी वनडे क्रिकेट मालिकेत झालेल्या सामन्यात भारत अ ने ऑस्ट्रेलियाच्या एनपीएस संघाचा तीन गडय़ांनी पराभव केला. या स्पर्धेतील भारताचा हा पाचवा सामना आहे.
चौरंगी वनडे क्रिकेट मालिकेत भारत “अ” संघ तीन गडय़ांनी विजयी
नाणेफेक जिंकून एनपीएस संघाला या सामन्यात भारत ‘अ’ संघाने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. 50 षटकात एनपीएस संघाने 9 बाद 234 धावा जमविल्या. एनपीएसतर्फे टर्नरने 1 षटकार आणि 8 चौकारासह 73, सिल्कने पाच चौकारांसह 67 आणि ऍबॉटने 4 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 41 धावा फटकाविल्या. भारत अ तर्फे शुक्ला आणि धवन यांनी प्रत्येकी दोन तर पटेलने एक गडी बाद केला. एनपीएसचे चार फलंदाज धावचित झाले. त्यानंतर भारत अ ने 39.5 षटकात 7 बाद 238 धावा जमवित हा सामना जिंकला.
केदार जाधवने 53 चेंडूत 4 षटकार आणि 11 चौकारासह 87, सॅमसनने 80 चेंडूत 6 चौकारासह 55, व्होराने 1 षटकार आणि 3 चौकारासह 25, राकेश धवनने 4 चौकारासह 22, कर्णधार उथप्पाने 3 चौकारासह 17 धावा केल्या. एनपीएसतर्फे मुरहेडने 92 धावात 4 तर ऍबॉटने 52 धावात 2 गडी बाद केले. या सामन्यात भारत अ ला 5 गुण मिळाले. या स्पर्धेत भारत अ ने गुणतक्त्यात 5 पैकी चार सामने जिंकत 19 गुणासह आघाडीचे स्थान मिळविले असून ऑस्ट्रेलिया अ 17 गुणासह दुसऱया स्थानावर आहे.
