
सांगली – राज्यात विधानसभेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करावी की नाही याचा निर्णय सोनिया गांधी व शरद पवार यांच्या हातात आहे. लवकरच ते निर्णय घेतील. मात्र, तोपर्यंत इतरांनी उगाच बडबड करू नये, असा सल्ला पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी स्वबळावर लढण्याचा इशारा देणार्या उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री आर. आर. पाटील यांना दिला आहे.
… कशाला बडबड, कदमांचा पवार, आर.आर.पाटील यांना सल्ला
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी जवळपास निश्चित आहे. जागावाटपाचाही फार मोठा प्रश्न नाही. सोनिया गांधी व शरद पवार यांच्याच हातात अंतिम निर्णय आहे. लवकरच ते याबाबत निर्णय घेतील. मात्र, तोपर्यंत स्वबळाची बडबड कोणी करू नये,असे त्यांनी स्पष्ट केले तसेच सीमाभागातील मराठी बांधवांवर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. सीमारेषा असल्या तरी असे हल्ले माणुसकीला काळिमा फासणारे आहेत. महाराष्ट्र सरकार याप्रकरणी आपले कर्तव्य पार पाडेल.अशी ग्वाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी टंचाईसाठी जिल्ह्याला दहा कोटींचा विशेष निधी मंजूर केल्याचे सांगत कदम म्हणाले, यातील दोन कोटी तळी खोदण्यासाठी तर, उर्वरित आठ कोटी अन्य कामांसाठी खर्च केले जाणार आहेत. वसंतदादा साखर कारखान्याची देणी भागवण्यासाठी कारखान्याची जमीन विकण्याचा प्रस्ताव शासनाकडे आला आहे. जागा विक्रीसाठी परवानगी मिळेल, त्यात काही अडचण नाही. आजारी साखर कारखाने अन्य सक्षम कारखान्यांना चालवण्यास देण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला आहे.असेही त्यांनी नमूद केले.
