
भारतीयांची मानसिकता, मॉलमध्ये माल महाग मिळत असल्याचा समज या व अशा अनेक कारणांमुळे रिलायन्स आणि आदित्य बिर्ला ग्रुपला त्यांची रिटेल स्टोअर्स परवडेनाशी झाली असल्याचे वृत्त आहे. रिलायन्सने त्यांची रिलायन्स फ्रेशची १०० दुकाने बंद करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे तर बिर्ला ग्रुपने त्यांची मोअर ही ३६ स्टोअर्स दोन वर्षांपूर्वीच बंद केली आहेत. ही रिटेल दुकाने बंद करून त्याऐवजी वेगाने विकसित होत असलेल्या ऑनलाईन रिटेल मध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न या कंपन्या करत आहेत.
रिलायन्स फ्रेश व बिर्लाची मोर रिटेल नुकसानीत
रिलायन्स फ्रेशचे सीएफओ आलोक अग्रवाल म्हणाले की आम्ही आमची स्टोअसे नवीन पद्धतीने ऑरगनाईझ करण्याचा विचार करत आहोत. १०० स्टोअर्स आम्ही बंद केली आहेत तर कांही स्टोअर्सचे एकत्रीकरण केले जात आहे. ऑनलाईन वरून खरेदी करण्याचा ट्रेंड भारतात चांगलाच वाढला आहे. भारतात मॉलची संख्या वाढते आहे मात्र त्यातही किराणा मालाला म्हणावा तसा उठाव मिळत नाही.
बिर्ला समुहाचे प्रणव बरूआ म्हणाले की किराणा माल विकण्यात मार्जिन कमी आहे. त्यातही भारतीय अजूनही आपल्या ठराविक वाण्याकडूनच असा माल घेण्यास प्रथम प्राधान्य देतात. परिणामी रिटेल स्टोअर्सना भरावे लागणारे प्रचंड भाडे, तुलनेने कमी फायदा यामुळे ही स्टोअर्स चालविणे परवडत नाही. फायदा व्हायला हवा असेल उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढायला हवी. त्यातच ऑनलाईन खरेदीने रिटेल व्यवसायापुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. भारतात २०१५ पर्यंत ऑनलाईन बाजाराची उलाढाल ९०२६ कोटींवर जाण्याचे संकेत दिले जात आहेत. भारतात रिटेल व्यवसायात ४० पेक्षा अधिक कंपन्या आहेत मात्र भारतीयांची माल खरेदी करताना किमत अगोदर लक्षात घेण्याची सवय आणि मॉल मधील माल महाग पडतो ही भावना यामुळे रिटेल व्यावसायिकांना व्यवसाय वाढीत अडचणी येत आहेत.
