
नवी दिल्ली : गव्हाचे दर वाढत असल्याने महागाईचा मुद्दा पुन्हा पेटू नये यासाठी सरकारने गोदामातील सुमारे एक कोटी टन गहू खुल्या बाजारात आणण्याचा विचार करीत आहे. गतवर्षी १६.१0 रुपये किलो दर असणारा गहू यंदाच्या वर्षी १९ रुपये प्रती किलो झाला आहे. त्यामुळे सरकारने राष्ट्रीय अन्नमहामंडळ अर्थात फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) संस्थेच्या गोदामातील एक कोटी टन गहू खुल्या बाजारात विकण्याचा प्रस्ताव अन्नमंत्रालयाने ठेवला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची आर्थिक व्यवहार समिती या प्रस्तावावर लवकरच निर्णय घेणार आहे.
महागाई ;गोदामातील एक कोटी टन गहू बाजारात येणार
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत एफसीआयच्या गोदामांतील सुमारे एक कोटी टन गहू घाऊक खरेदीदारांना विकण्याचा अन्नमंत्रालयाचा प्रस्ताव विचारार्थ घेण्यात येणार आहे. अन्नमंत्रालयाने गहू ओएमएसएस अंतर्गत किमान हमीभावाला आणि हव्या त्या ठिकाणी हा माल पोहोचवण्याठी येणारा वाहतूक खर्च समाविष्ट करून जी किंमत येईल, त्या किमतीस विकण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावित गहू विक्रीमुळे देशातील गव्हाचा पुरवठा वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे बाजारात भाववाढ रोखण्यास मदत होईल. तसेच फूड कॉर्पोरेशनकडील साठा कमी होऊन साठा करण्याची समस्याही थोडी हलकी होईल, असा अन्नमंत्रालयाचा विचार आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय बाजारात गव्हाचा घाऊक भाव वाढत असून तो आता प्रतिकिलो १९ रुपये झाला आहे. गेल्या वर्षातील याच कालावधीत गव्हाचा दर १६.१0 रुपये किलो असा होता. १ जुलै २0१४ रोजी एफसीआयकडे चार कोटी टन गव्हाचा साठा असून देशाला गरज सुमारे दोन कोटी टन गव्हाची आहे. सन २0१४-१५ वर्षात देशात ९.५६ कोटी टन गहू पिकला होता.
