
ब्राझील – ब्रिक्समधील पाच देशांची समान हिस्सेदारी असलेल्या ब्रिक्स विकास बॅकेची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा ब्रिक्स संमेलनात करण्यात आली आहे. या बँकेचा पहिला अध्यक्ष भारतीय असेल असेही समजते. नंतर प्रत्येक देशाला अध्यक्षपद पाळीपाळीने दिले जाणार आहे. बँकेचे मुख्यालय चीनची आर्थिक राजधानी शांघाय येथे असणार आहे. भारताने हे मुख्यालय दिल्लीत असावे यासाठी आग्रह धरला होता असेही समजते.
ब्रिक्स विकास बँकेची स्थापना- पहिला अध्यक्ष भारताचा
ब्राझीलमध्ये भरलेल्या दोन दिवसीय ब्रिक्स परिषदेसाठी भारताचे पंतप्रधान मोदी, चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन, दक्षिण आफ्रिकेचे जैकब जुम्मा आणि ब्राझीलच्या डिल्मा रोसेफ उपस्थित आहेत. त्यातच या बँकेच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला. ही बँक ब्रिकस देशांना पायाभूत सुविधा आणि विकास परियोजनांसाठी अर्थसहाय्य देणार आहे. सुरवातीला पाची देश प्रत्येकी १० अब्ज डॉलर्स या बँकेसाठी गुंतविणार आहेत.
या बॅकेत सर्व सहभागी देशांना समान हिस्सा मिळाला पाहिजे असा आग्रह भारताने धरला होता. कारण जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थांवर अमेरिका आणि जपानचे वर्चस्व असल्याची तक्रार नेहमी केली जाते. त्याप्रमाणे या ब्रिकस बँकेवर एका देशाचे वर्चस्व आहे अशी तक्रार येऊ नये म्हणून समान हिश्श्याची मागणी भारताने लावून धरली होती.
