स्टीव्ह सोबत लंच – नको रे बाबा

steve
अॅपल कंपनीचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज याच्या विक्षिप्तपणाच्या अनेक हकीकती सांगितल्या जातात. मात्र विक्षिप्त असला तरी स्टीव्हची खरी ओळख आहे ती प्रॉडक्टा डिझाईन विकासातील हाय स्टँडर्ड कायम राखण्यासाठी. कर्मचार्‍यांकडून अधिक काम कसे करून घ्यायचे यापेक्षा त्यांना अधिक काम करण्यास कसे उद्युक्त करायचे याची एक किल्ली स्टीव्हकडे होती असेही बोलले जाते. सतत कामाचा आणि आपल्या उत्पादनांचा विचार त्याच्या डोक्यात घेाळत असे. मात्र स्टीव्ह सोबत लंच घेण्यास कंपनीचा कुणीही कर्मचारी कधीच तयार नसे अशी त्याची आठवणही सांगितली जाते.

अॅपलमध्ये १२ वर्षे काम करून कंपनी सोडलेले माजी कर्मचारी डेव्हीड ब्लॅक सांगतात, अॅपलचा कोणताच कर्मचारी स्टीव्ह सोबत लंच करत नसे. चुकून स्टीव्हची आणि त्यांची लंचची वेळ एक आलीच तर दहा मिनिटात कर्मचारी लंच आटोपून पसार होत असत. स्टीव्ह खूपच कमी बोलत असे. त्याच्या उपस्थितीचा कर्मचार्‍यांवर मोठा प्रभाव पडत असे. मात्र स्टीव्ह नेहमी आपल्याच नादात असे. तो कांही तरी विचारेल आणि आपण त्याचे उत्तर देऊ शकणार नाही असे कर्मचार्‍यांना सतत वाटत असे. परिणामी कर्मचारी लंचसाठी किवा लिफटमध्येही त्याच्याबरोबर येण्याचे टाळत असत.

स्टीव्ह कुणीही समोर आला की त्याला एकच प्रश्न विचारत असे. तुम्ही सध्या कशावर काम करताय? प्रश्न साधाच असला तरी उत्तर द्यायची वेळ ज्या कर्मचार्‍यावर येईल तो घाबरूनच जात असे असा अनुभवही डेव्हीड सांगतात.

Leave a Comment