कृषि माल प्रक्रिया उद्योग

krishi
शेतकरी हा कच्चा माल पिकवितो आणि तो कच्चा माल विकत घेऊन मग कारखानदार आणि उद्योजक त्यापासून पक्का माल तयार करतात. कच्चा माल स्वस्तात विकल्यामुळे शेतकर्‍यांच्या पदरात काही पडत नाही. परंतु त्यापासून पक्का माल तयार करणारा कारखानदार त्याच्यापासून किती तरी जास्त पैसे कमवत असतो. याची शेतकर्‍यांना कल्पना सुद्धा नसते. वास्तविक पाहता शेतकरी आपल्या कच्च्या मालापासून बनवलेला पक्का माल स्वत:च महागात खरेदीही करत असतो. परंतु तो आपल्या कच्च्या मालाची किंमत आणि आपल्याच कच्च्या मालापासून तयार झालेल्या आणि आपण खरेदी करत असलेल्या पक्क्या मालाची किंमत याची कधी तुलनाच करीत नाही. त्यामुळे त्याला शेती मालावर प्रक्रिया करण्याच्या उद्योगाचे महत्व लक्षात येत नाही.

शेतकर्‍यांनी आपल्या मनाला एक सवय लावून घ्यावी. आपण शेतात काय तयार करतो आणि त्या कच्च्या मालापासून कोणता पक्का माल तयार होतो याची यादी करावी. आपण कच्च्या मालाचे उत्पादक म्हणून किती लुटले जात असतो याची तेव्हाच त्याला कल्पना येईल. उदा. अनेक शेतकरी बाजारातून पाव किंवा ब्रेड आणून खातात. एका सामान्य ब्रेडच्या लादीचे वजन २५० ग्रॅम असते आणि त्याची किंमत १५ ते १६ रुपये असते. आपण मात्र आपला गहू ८ किंवा ९ रुपये किलो अशा दराने विकून टाकलेला असतो. म्हणजे अडीचशे ग्रॅम वजनाच्या ब्रेडसाठी ङ्गार तर दोन ते तीन रुपयांचा गहू लागतो. परंतु त्या गव्हाचा मैदा तयार करून त्यापासून ब्रेड तयार करणारा मात्र १५ ते १६ रुपये कमावतो. याला म्हणतात व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे मूल्यवर्धन. दोन रुपयाच्या गव्हावर प्रक्रिया केली की त्याचे झाले १५ रुपये. म्हणजे गव्हात तेरा रुपयांचे मूल्यवर्धन झाले. हे तेरा रुपये पूर्णपणे कारखानदाराच्या पदरात पडत नाहीत. त्यातला काही पैसा प्रक्रियेमध्ये, विक्रीच्या दलालीमध्ये, पॅकिंगमध्ये आणि वाहतुकीमध्ये खर्च होतो. परंतु तो दोन रुपयाच्या गव्हातून चार रुपये तरी नक्कीच कमावतो. अशारितीने आपण कधी हिशोबच करत नाही.

एखाद्या वेळी प्रवासाला गेल्यावर बसमध्ये बसताना एखादा शेतकरी दहा रुपये देऊन बटाट्याचे वेङ्गर्स खरेदी करतो. साध्या प्लॅस्टिकच्या पिशवीतून दिले जाणारे वेङ्गर्स २५ ग्रॅम असतात आणि त्याला सात ते आठ रुपये लागतात. परंतु सध्या अंकल चिप्स् नावाने काही वेङ्गर्स विक्रीला यायला लागले आहेत. त्या वेङ्गर्सचे वजन ङ्गार तर १० ग्रॅम किंवा १५ ग्रॅम असेल. शहरातल्या श्रीमंत माणसांचे पोट तेवढेच वेङ्गर्स खाऊन भरत असेल. पण खेडेगावच्या अंग मेहनत करणार्‍या माणसाला मात्र हे वेङ्गर्स दाताच्या ङ्गटी बुजविण्याला सुद्धा उपयोगी पडत नाहीत इतके ते कमी असतात. एवढे पैसे देऊन एवढे किरकोळ वेङ्गर्स खरेदी करणार्‍या प्रवाशांमध्ये किंवा शेतकर्‍यांमध्ये एखादा बटाटा उत्पादक शेतकरीही असू शकतो. तो काही बटाट्याची किंमत आणि वेङ्गर्सची किंमत यांची तुलना करीत नाही. त्याचे बटाटे ङ्गार तर पाच ते सहा रुपये किलो अशा दराने विकले गेलेले असतात. मात्र त्याच्या एक किलो बटाट्यापासून तयार केलेल्या वेङ्गर्स पोटी वेङ्गर्स तयार करणारा उद्योजक तब्बल दीडशे रुपये कमवतो. हे दीडशे रुपये पूर्णपणे त्याच्या पदरात पडतही नसतील. परंतु त्यातले निदान २०-२५ रुपये तरी त्याची कमाई असतेच.

शेतकरी मात्र सहा रुपये किलोने बटाटे विकून आपल्या या व्यवहारात काय कमाई झाली याचा हिशोब करायला लागतो तेव्हा त्याच्या हातात काहीच उरत नाही. वेङ्गर्स करणारा मात्र ङ्गायद्यात असतो. एकदा आपण शेतातल्या सगळ्या कच्च्या मालाचा आणि पक्क्या मालाचा हिशोब करायला बसल्याशिवाय आपण का गरीब आहोत हे लक्षात येणार नाही. कृषी मालावर प्रक्रिया करून त्या मालाची विक्री करून ज्यादा पैसा कमवता येतो. प्रथमदर्शनीच हा काही तरी अवघड प्रकार असेल, असेच लोकांना वाटते. पण हा प्रकार म्हटले तर अवघड आहे आणि म्हटले तर सोपा सुद्धा आहे. ङ्गळांपासून दारू तयार करणे (या दारूला सभ्य भाषेत ‘वाईन’ असे म्हणतात. या वाईनने जास्त नशा येत नाही.) हा तर एक प्रक्रिया उद्योग आहेच, परंतु तो ‘तसा’ अवघड आहे. ‘तसा’ अशा करिता म्हणतो की, दारू गाळणे सोपे आहे, परंतु त्याचे परवाने, कर आणि विक्री या गोष्टी सामान्य शेतकर्‍यांच्या आवाक्यातल्या नाहीत. या दारूचे प्रचंड मार्केट निर्माण होत आहे.

पाश्‍चिमात्य देशांमध्ये जेवायला बसताना आई, वडील, मुलगा, मुलगी, नातवंडे, आजी, आजोबा अशी सारीच मंडळी आपण तीर्थ घेतो त्याप्रमाणे थोडी थोडी वाईन पिऊनच जेवायला सुरुवात करतात. त्यांच्या संस्कृतीत त्याला व्यसन मानलेले नाही. या वाईनमुळे थोडीशी भूक चाळवली जाते आणि चार घास जास्तच पोटात जातात. आपल्या देशामध्ये यूरोप, अमेरिकेतल्या लोकांचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती आहे. त्यामुळे आज ना उद्या आपल्याही घरामध्ये हा प्रकार सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजे वाईनला प्रचंड मागणी येणार आहे. त्यामुळे राज्यातल्या प्रभावी नेत्यांनी आणि पुढार्‍यांनी वाईन उद्योगावर आपली पकड बसवण्यास सुरुवात केलेली आहे. परिणामी सामान्य शेतकर्‍यांनी या भानगडीत न पडलेले बरे. त्या अर्थाने वाईन उद्योग आपल्यासाठी अवघड आहे. मात्र काही काही साधे सोपे प्रक्रिया उद्योग आपल्या आवाक्यात आहेत. ते जरी आपण छान केले तरी आपल्या शेतातल्या मालाला एरवी मिळतात त्यापेक्षा चार पैसे जास्त मिळणार आहेत.

प्रक्रिया उद्योग हा समृद्धीचा मार्ग आहे. त्याचे एक उदाहरण आवर्जून द्यावेसे वाटते. महाराष्ट्रात द्राक्षापासून बेदाणा तयार केला जातो. ही प्रक्रियाच आहे. या प्रक्रियेचे काय ङ्गायदे होऊ शकतात याचा अनुभव या शेतकर्‍यांनी घेतलेला आहे. मात्र या प्रक्रिया उद्योगाने महाराष्ट्राचे नाव सार्‍या जगात झालेले आहे. पूर्वीच्या काळी बेदाणा, बदाम, काजू, आक्रोड अशा सुक्या मेव्यासाठी अङ्गगाणिस्तान प्रसिद्ध होते. जगातला कोणताही व्यापारी आजचा सुक्या मेव्याचा भाव काय आहे, याची चौकशी करण्यासाठी अङ्गगाणिस्तानातल्या कंदाहार शहरात असलेल्या ठोक व्यापाराकडे ङ्गोन करत असे. म्हणजे सुक्या मेव्याच्या जागतिक बाजारपेठेचे केंद्र कंदाहारमध्ये होते. परंतु महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांनी हे केंद्र आपल्याकडे खेचून आणलेले आहे आणि आता सांगली जिल्ह्यातले तासगाव हे गाव बेदाण्यासाठी सार्‍या जगात प्रसिद्ध झाले आहे.

या गावामध्ये बेदाण्याच्या खरेदी विक्रीचे करोडो रुपयांचे व्यवहार होत असतात. ही किमया प्रक्रिया उद्योगाने घडवली आहे. निव्वळ द्राक्षे बाजारात नेऊन विकण्यापेक्षा आणि तिथल्या व्यापार्‍यांच्या लहरीचे बळी होण्यापेक्षा द्राक्षाच्या मणुका किंवा बेदाणा तयार केला तर आपण स्वावलंबी होऊ शकतो. जोपर्यंत बेदाण्याला भाव येत नाही, तोपर्यंत मी माझा बेदाणा विकणार नाही, असा पण तो करू शकतो. म्हणजे बेदाण्याने या शेतकर्‍यांची मान दलालांच्या आणि व्यापार्‍यांच्या कचाट्यातून काही प्रमाणात का होईना सोडलेली आहे. ही किमया घडवून आणण्यासाठी बेदाणा तयार करावा लागला. सुरुवाती सुरुवातीला बेदाण्याचे तंत्र लोकांना माहीत नव्हते. परंतु हळु हळु ते माहीत होत गेले आणि आता ते तंत्र अंगवळणी पडलेले आहे. अशाच प्रकारच्या काही प्रक्रिया आपल्याला अवगत होऊ शकतात आणि आपण महाराष्ट्रामध्ये ङ्गळे, भाज्या, धान्ये यांच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे करून प्रक्रिया क्रांतीच करू शकतो.

8 thoughts on “कृषि माल प्रक्रिया उद्योग”

  1. साहेब मला गुळ कारखाना चालू करायचा आहे त्या साठी कर्ज पुरवठा कोठु मिडनार व् यात काहि गवरमेंट सुविधा आहे का

  2. साहेब मला गुळ कारखाना चालू करायचा आहे त्या साठी कर्ज पुरवठा कोठु मिडनार व् यात काहि गवरमेंट सुविधा आहे का

  3. मला प्रकिया उद्योग सुरू करायचा आहे ( ऊस व कापुस ) तर मला पूर्ण माहिती व सहकार्य मिळावे ही विनंती .

  4. मला शेतमाल प्रक्रिया उद्योग माहिती पाहिजे

  5. मुकूंद काळे

    मला प्रकिया उधोग सुरू करायचा आहे ( मिरची आणि बटाटा ) तर मला पूर्ण माहिती व सहकार्य मिळावे.

  6. मदन परदेशी

    मी जिद्दी आणि मेहनती आहे मला मनापासून शेती प्रकिया ऊद्याेग (डाळिंब किंवा तत्सम) सरू करावयाचे आहे. माहिती व सहकार्य मिळावे.

  7. मला पण शेती मालावर आधारीत प्रक्रीया उद्योग करायचा आहे त्यासाठी मला माहीती द्या

Leave a Comment