
वॉशिग्टन- इराक आणि सिरीयामधील कांही भागावर कब्जा करून स्वतंत्र इस्लामिक राज्याची तसेच अबू बकर अल बगदादी यांची या देशाचा खलिफा म्हणून घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. मात्र अमेरिकेने या अबू बकर सबंधीची पूर्ण माहिती देणार्यासाठी २०११ मध्येच १ कोटी डॉलर्सचे इनाम देण्याची घोषणा केली होती. अजूनही ही इनामाची रक्कम माहिती देणारा कोणीही मिळवू शकतो असे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अबू बगदादीच्या ठिकाणाचा पत्ता लागल्यास त्याला अटक करणे सुलभ होईल या विचाराने हे इनाम ठेवले गेल्याचे सांगितले जात आहे.
नव्या खलिफाची माहिती द्या – १ कोटी डॉलर्स मिळवा
अबू बगदादीचा खलिफा झाल्यानंतर जो पहिला व्हिडीओ प्रसारीत करण्यात आला, त्यात त्याने – मी तुमचा नेता आहे मात्र मी सर्वोत्तम नेता नाही. माझा मार्ग बरोबर असेल तर मला मदत करा, चुकत असेल तर योग्य मार्गावर आणा. माझ्या आज्ञा पाळा आणि सर्व जगभरातील मुस्लीमांनी या देशात एकत्र या असे आवाहन केले आहे. आज उपलब्ध असलेल्या माहितीनुसार अबू बगदादीचे नाव अबु दुआ असे असून इराकमधील समारा येथे १९७१ साली त्याचा जन्म झाला आहे. अमेरिका त्याची सर्व माहिती मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
