रेल्वे अर्थ संकल्पामुळे शिवसेना खासदार नाराज

railway
मुंबई – आज सदर झालेल्या रेल्वे अर्थ संकल्पामधून महाराष्ट्राची घोर निराशा झाली असून जनतेच्या तोंडाला पानेच पुसल्या गेल्याची भावना जनतेमध्ये आहे. रेल्वे अर्थ संकल्पामध्ये महाराष्ट्राच्या कित्येक प्रलंबित प्रश्नावर चकारही नसल्याने हेच का अच्छे दिन असा प्रश्न जनतेला पडला आहे. आज सदर झालेल्या रेल्वे अर्थ संकल्पामधून महाराष्ट्राची घोर निराशा झाल्यामुळे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे खासदारही चांगलेच नाराज झाले आहेत.

महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थ संकल्पातून काही आलेले नाही. याबाबत काँग्रेस तर्फे ‘आदर्श’ मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, राजीव सातव आणि विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उघड नाराजी व्यक्त केली असून सेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राजन विचारे यांनी या रेल्वे अर्थ संकल्पातून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसल्याची भावना व्यक्त केली.

त्याचबरोबर औरंगाबाद मराठवाड्याला या बजेटमधून काहीही मिळालेले नाही. मराठवाड्यात पर्य़टनाच्या निमित्ताने हजारो पर्यटक येतात. मात्र थेट मुंबईशी कनेक्टीव्हीटी असलेली फक्त एक गाडी औरंगाबादसाठी आहे. पुण्यासाठी एकही नाही. औरंगाबाद शहराचा होत असलेला विकास, इथला मोठा पर्य़टन उद्योग आणि रेल्वे देत असलेल्या सुविधा यांचा एकमेकांशी ताळमेळ नाही. त्यामुळं मराठवाड्याचा विचार करता अच्छे दिन नाहीत अशीच भावना जनतेची आहे.