
रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील प्रस्तावित अणु ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चाकडेच शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी पाठ फिरवल्याने चर्चेला उधाण आले आहे ,विशेष म्हणजे जैतापूर प्रकल्पाविरोधात टाहो फोडणारे आमदार -खासदार मोर्चात का सहभागी झाले नाहीत यावरून तर्क -वितर्क सुरु झाले आहे.
‘जैतापूर’विरुद्ध टाहो; पण मोर्चाकडेच ‘त्यांची’ पाठ
साखरीनाटे येथे जनहक्क समितीच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मात्र या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध केलेले सेनेचे आमदार राजन साळवी आणि नवनिर्वाचित खासदार विनायक राऊत गैरहजर राहिले. प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात आलेल्या नवीन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, समितीचे अध्यक्ष भिकाजी वाघधरे, मच्छीमार नेते अमजद बोरकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अजित नारकर, पंचायत समितीचे सभापती कमलाकर कदम आदी नेते मोर्चामध्ये सहभागी झाले. शिवसेनेचे स्थानिक आमदार राजन साळवी यांनी या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध केला असून, अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले आहे. केंद्रामध्ये भाजपप्रणीत सरकार आल्यानंतर केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रकल्पाच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे. मात्र शिवसेनेचा प्रकल्पाला विरोध कायम असल्याचे साळवी यांनी स्पष्ट केले होते. या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले खासदार राऊत यांनीही साळवी यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. मात्र निवडणुकीनंतर प्रथमच काढण्यात आलेल्या प्रकल्पविरोधी मोर्चाला हे दोन्ही नेते मात्र उपस्थित राहिले नाहीत.
