
मुंबई – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे नेतृत्व करणार असून, शिवसेनेत मुख्यमंत्रीपदाबाबतचा प्रस्ताव ठेवण्याची पद्धत नाही, त्यामुळे राज्याला मुख्यमंत्री शिवसेनाच देणार आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार असा स्पष्ट निर्वाळा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
शिवसेनेच्या 48 व्या वर्धापनदिनानिमित्त बांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात सुरू असलेल्या मेऴाव्यात याबाबत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही पदाधिकाऱ्यांच्य़ा बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या नावाचा नारा दिला आहे.
आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांना यावेळेस शिवसेनेला विधानसभेत 150 आमदार निवडूण आणायचे आहेत आणि त्यासाठी शिवसेनेचे मिशन 150 हा उपक्रम घेवून मी राज्यभर फिरणार असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले.
शिवसेनेच्या या घोषणेमुळे मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीत आता चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे. याआधी सेना-भाजपात मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेतले जाण्याचे वृत्त होते. मात्र शिवसेनेने स्वत:च उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा केल्याने महायुतीत मुख्यमंत्रीपादासाठी चांगलीच स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
