आठवलेंनी आवळला राग; पाहिजेत जास्त जागा

ramdas
मुंबई – रिपब्लिकन पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून जास्त जागा पाहिजेत. विधानसभेत एकूण २५ जागा मिळाव्यात तसेच त्या जागांवर मित्रपक्षांचे बंडखोर उभे राहू नयेत, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली. विधानसभेच्या जागावाटपावरुन सध्या महायुतीत मतभेद सुरु असताना आरपीआयनेही जास्त जागांची मागणी केल्याने गोंधळ वाढणार आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील मित्रपक्षांना रिपब्लिकन पक्षाने पूर्ण ताकदीने मदत केली आहे. त्याचप्रमाणे मित्रपक्षांनी रिपाइंच्या उमेदवारांना जिंकून येण्यासाठी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक चेंबूर येथे पार पडली. त्यावेळी आठवले बोलत होते.

साताऱ्याची जागा लोकसभा निवडणुकीत पक्षाला सोडण्यात आली होती; पण मित्रपक्षांची मते त्या उमेदवाराला मिळाली नाहीत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जिंकण्याची खात्री असलेल्या २५ जागा मिळाव्यात आणि मित्रपक्षांनी मदत करावी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता मिळवण्यासाठी जास्तीत जास्त जागांवर विजयी होण्याची गरज आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत निश्‍चितपणे सत्तांतर घडेल, असा विश्‍वास आठवलेंनी व्यक्त केला. सत्ता आल्यानंतर पक्षाला मंत्रिमंडळ व महामंडळ या माध्यमातून सत्तेमध्ये १५ टक्के वाटा मिळणे आवश्‍यक आहे, याबाबतचा ठरावही या बैठकीत संमत करण्यात आला.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, कष्टकरी, शेतकरी व शेतमजूर या सर्वांना आर्थिक व सामाजिक न्याय मिळवून देईल, असा विश्‍वास या वेळी व्यक्त करण्यात आला.