
मुंबई – लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळविल्यानंतर भाजपने आता विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे,विशेष म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः लक्ष घालून सर्व सूत्रे हाताळणार आहेत. त्यात त्यांचे विश्वासू आणि उजवे हात मानले जाणारे अमित शहा यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात येणार आहे,मुख्यत्वे महाराष्ट्र हेच लक्ष्य अमित शहा यांच्यासमोर ठेवण्यात आले आहे.अशी चर्चा भाजप वर्तुळात आहे.शहा यांच्यामुळे शिवसेना कोंडीत सापडणार असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा अमित शहांकडे महाराष्ट्राची धुरा,सेनेची कोंडी ?
लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील भाजपच्या प्रचाराची संपूर्ण धुरा सांभाळून राज्यात पक्षाला अमाप यश मिळवून देणारे अमित शहा यांना केंद्रीय मंत्रिमंडळाबाहेर ठेवून त्यांच्यावर ‘काँग्रेसमुक्त भारत’ मोहिमेच्या पूर्ततेची जबाबदारी सोपविण्याचे स्पष्ट संकेत मोदी यांनी दिले आहेत.मात्र महाराष्ट्रात येत्या ऑक्टोबरमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकांवर आता भाजपने लक्ष केंद्रित केले आहे त्यासाठी आखण्यात येणाऱ्या रणनीतीमध्ये अमित शहा यांचा सहभाग महत्वपूर्ण असणार आहे.
नरेंद्र मोदी लाटेने देशातच काय महाराष्ट्रातही दिग्गजांना ‘घरचा रस्ता ‘ पहावा लागला,त्यामुळे राज्यात महायुतीची ताकद वाढल्याने त्याचा नेमका फायदा विधानसभा निवडणुकीत करून घेण्याचा चंग भाजपने बांधला आहे,शिवाय राज्यातील भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, रखडलेले प्रकल्प, वीजटंचाई, महागाई, धोरण लकवा आदी मुद्देही प्रचारासाठी आणि सत्तांतरासाठी पोषक असल्याने अमित शहा यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी निश्चित झाली आहे. नाही तरी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांच्या विधानसभानिहाय निकालावरून, सध्याच्या सत्तारूढ काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला चांगलाच फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या तसेच दिग्गज आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातही काँग्रेस राष्ट्रवादीची पीछेहाट झाली तसेच मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा फायदाही भाजप-सेना महायुतीला झाल्याचे स्पष्ट झाले आहे.अशी गणिते भाजपमधून मांडली जात आहे.
