मोदी शपथविधीचे पाक टीव्हीवरून थेट प्रसारण

pak
भारताचे १५ वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी शपथ घेतली त्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण पाकिस्तान मधल्या टिव्ही चॅनलनी केले असून अनेक पाकिस्तानी नागरिकांनी हा संपूर्ण सोहळा पाहिला असल्याचे समजते. पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ या सोहळ्याला उपस्थित होते व त्यामुळे या संपूर्ण कार्यक्रमाचेच थेट प्रसारण केले गेले असे सांगितले जात आहे.

पाक दूरदर्शन वाहिन्यांचा मुख्य फोकस नवाझ शरीफ, निमंत्रित बॉलीवूड कलाकार, भारतीय उद्योगपती यांच्यावर अधिक होता.या कार्यक्रमादरम्यान खास टॉक शोही आयोजित करण्यात आले होते आणि त्यात भारत पाक संबंधांबाबतच मुख्य चर्चा केली गेली. माजी लेफटनंट जनरल मसूद यांनी भारत पाक संबंध सुरळीत होण्यासाठी ही चांगली आणि योग्य वेळ असल्याचे मत व्यक्त करताना मोदी हे भारतातील मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करत असल्याचे आणि मध्यमवर्ग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सांगितले. मुंबई हल्ल्यासारख्या घटना पुन्हा घडता कामा नयेत अन्यथा सुरळीत होऊ घातलेले संबंध पुन्हा बिघडतील असेही मत व्यक्त केले आहे.

अनेक नामवंतांनीही भारत पाक दोन्ही देशांना विकासासाठी शांतता आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त केले तसेच शरीफ यांच्या उपस्थितीमुळे भारत पाक या दोन्ही देशांना फायदाच होईल असेही नमूद केले आहे.