बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात बदल! या खेळाडूला मिळू शकते स्थान


चौथ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात मोठा बदल करण्यात आला आहे. मेलबर्न येथे होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीसाठी 19 वर्षीय युवा सलामीवीर सॅम कॉन्स्टासला संधी देण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये दोन सामने बाकी असून हे सामने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाने कॉन्स्टासवर मोठी बाजी मारली आहे. कॉन्स्टासने पीएम इलेव्हनकडून खेळताना भारताविरुद्धच्या सराव सामन्यात झंझावाती शतक झळकावले होते. त्याने केवळ 97 चेंडूत 107 धावा केल्या होत्या. तेव्हापासून त्याच्या संघातील समावेशाची चर्चा होती.

ऑस्ट्रेलियासाठी सलामी ही मोठी समस्या आहे. आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये एकही सलामीवीर 40 पेक्षा जास्त धावा करू शकला नाही. जसप्रीत बुमराहच्या पुढे अनुभवी उस्मान ख्वाजा आणि 25 वर्षीय नॅथन मॅकस्विनी सतत संघर्ष करताना दिसले. त्यामुळे ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनाने बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोड स्पोर्ट्स आणि द सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार, मॅकस्विनीला मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीतून वगळण्यात येईल. शुक्रवारी 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या चौथ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात सॅम कॉन्स्टासच्या नावाची घोषणा केली जाईल. म्हणजेच बुमराहला आव्हान देण्यासाठी ऑस्ट्रेलिया आपला बॅटिंग सेन्सेशन कॉन्स्टास मैदानात उतरवेल.

सॅम कॉन्स्टासने पीएम इलेव्हनसाठी भारताविरुद्ध शतक झळकावल्यानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. या 19 वर्षीय खेळाडूने सांगितले होते की, तो फक्त संधीची वाट पाहत आहे. त्याचबरोबर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 रोमांचक सामन्यांनंतर तो आणखीनच उत्साहित झाले आहेत. नुकतेच त्याने पुन्हा एकदा वक्तव्य केले आहे. कॉन्स्टासने सांगितले की, तीन सामन्यांदरम्यानचा नाट्य आणि उत्साह पाहिल्यानंतर भारताविरुद्ध कसोटी पदार्पण करण्याची इच्छा आणखीनच वाढली आहे.