Box Office Collection: नवव्या दिवशीही ‘पुष्पाराज’ची जादू कायम, अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने गाठला 750 कोटींचा पल्ला


5 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला. त्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 9 दिवस झाले आहेत, या दिवसात चित्रपटाने देशभरात मोठी कमाई केली आहे. ‘पुष्पा 2’ पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने कमाईचे आकडे तेलुगू आवृत्तीपेक्षा अधिक मजबूत केले आहेत.

पहिल्या आठवड्याच्या कमाईनंतर हा चित्रपट आता दुसऱ्या आठवड्याच्या वीकेंडवर पोहोचला आहे, मात्र आठव्या दिवशी या चित्रपटाने या वर्षीच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कल्की 2898 एडी’चा रेकॉर्डही मोडला आहे. नवव्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर आठव्या दिवसाच्या कमाईच्या आसपास हा चित्रपट राहिला. ‘पुष्पा 2’ रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. जर आपण चित्रपटाच्या ओपनिंग डे कलेक्शनवर नजर टाकली, तर ‘पुष्पा 2’ ने 164.25 रुपये कमावले होते.

Sacknilk च्या रिपोर्टनुसार, ‘पुष्पा 2’ ने नवव्या दिवशी 36.25 कोटींची कमाई केली आहे. नवव्या दिवशीही ‘पुष्पा 2’च्या हिंदी आवृत्तीने इतर सर्व भाषांपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाच्या तेलुगू व्हर्जनने 7.5 कोटी रुपये कमवले आहेत, तर हिंदी व्हर्जनने तिप्पट म्हणजे 21 कोटी रुपये कमवले आहेत. एकूण कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, चित्रपटाच्या तेलुगू आवृत्तीने नवव्या दिवसापर्यंत 249.5 कोटी रुपये कमावले आहेत, तर हिंदी आवृत्तीने 453.1 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

केवळ देशातच नाही तर ‘पुष्पराज’ची जादू जगभर पसरली आहे. हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाला नसला, तरी ‘पुष्पा 2’ ने 1059.85 कोटींची कमाई केली आहे. एवढेच नाही तर लवकरच हा चित्रपट भारतात 800 कोटींचा आकडा पार करेल.