अल्लू अर्जुनला 14 दिवसांचा तुरुंगवास, संध्या थिएटर प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय


साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला नामपल्ली कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुनविरुद्ध एफआयआर नोंदवून त्याला अटक केली होती. यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले, जिथे न्यायालयाने अभिनेत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दुसरीकडे अल्लू अर्जुनच्या याचिकेवरही हायकोर्टात सुनावणी सुरू आहे.

ट्रायल कोर्टाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्यानंतर, तेलंगणा उच्च न्यायालय त्याच्याविरुद्ध नोंदवलेली एफआयआर रद्द करणार का, हे पाहणे बाकी आहे. रिमांडबाबतचा खेळ अद्याप संपलेला नाही. सध्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. पुष्पा-2 या चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी अल्लू अर्जुन थिएटरमध्ये आला, तेव्हा मोठ्या संख्येने चाहते आल्याने चेंगराचेंगरी झाली. या घटनेत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. तिचा मुलगाही गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अल्लू अर्जुनविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

अल्लू अर्जुनला त्याच्या घराजवळून अटक करण्यापासून ते नामपल्ली कोर्टात हजर राहण्यापर्यंत सर्व काही सस्पेन्समध्येच राहिले. या घडामोडी पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली. दुसरीकडे, अल्लू अर्जुनशी संबंधित प्रकरणावर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कायद्यापुढे सर्व समान आहेत… कायदा या प्रकरणी मार्ग काढेल. यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप स्वीकारला जाणार नाही, असे ते म्हणाले.

अल्लू अर्जुनच्या अटकेचा विरोधकांनी निषेध केला आहे. बीआरएसचे कार्याध्यक्ष केटीआर म्हणाले की अल्लू अर्जुनबाबत सरकारचा दृष्टिकोन योग्य नाही. अल्लू अर्जुनला सामान्य गुन्हेगार समजणे योग्य नाही. अल्लू अर्जुनच्या अटकेसाठी केंद्रीय मंत्री बंदी संजय यांनी सरकारला जबाबदार धरले. चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू होणे दुर्दैवी आहे. चेंगराचेंगरीसाठी त्यांनी सरकारच्या अपयशाला जबाबदार धरले.

अल्लू अर्जुनने संध्या थिएटर चेंगराचेंगरीप्रकरणी उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. या अभिनेत्याने हायकोर्टात याचिका दाखल करून पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर त्वरीत सुनावणीची आणि रद्द करण्याची मागणी केली आहे. अल्लू अर्जुनची याचिका न्यायालयाने मान्य केली आहे.