
भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू सलीम दुर्रानी यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. 60 आणि 70 च्या दशकात सलीम दुर्रानी यांनी भारतीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू म्हणून एक खास ओळख निर्माण केली होती. ते एक शानदार फलंदाज होते. जेव्हा ते खेळण्यासाठी बाहेर पडायचे, तेव्हा क्रिकेटच्या मैदानावर त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी व्हायची. सलीम दुर्रानी यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे 11 डिसेंबर 1934 मध्ये झाला. सलीम दुर्रानी यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जरी लहान असली, तरी त्यांनी या काळात खूप नाव कमावले आणि त्यानंतर अभिनयाच्या जगातही प्रवेश केला.
अफगाणिस्तानात जन्म, भारतासाठी खेळला क्रिकेट, छोट्या कारकिर्दीत मिळवली खूप प्रसिद्धी, नंतर झाला अभिनेता
सलीम दुर्रानी यांचा जन्म भारतात नसून काबुल, अफगाणिस्तान येथे झाला होता. पण ते तीन वर्षांचा असताना त्यांचे आई-वडील भारतात आले आणि त्यानंतर सलीम दुर्रानी भारताकडून क्रिकेट खेळले. सलीम दुर्रानी हे चाहत्यांचा आवडते क्रिकेटर होते, कारण ते त्यांच्या मागणीनुसार षटकार मारत असे. दुर्राणी स्टेडियमच्या कोपऱ्यातून षटकार मारून चाहत्यांचे मनोरंजन करत असे. जेव्हा ते फलंदाजीला यायचे, तेव्हा चाहते ‘वुई वॉन्ट सिक्सर’चा नारा द्यायचे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास, सलीम दुर्रानी यांनी 1960 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले होते. मात्र, त्यांनी शेवटची कसोटी 1973 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. विशेष म्हणजे त्यांनी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर पहिला आणि शेवटचा असे दोन्ही सामने खेळले. या कालावधीत, त्यांनी भारतासाठी एकूण 29 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी एक शतक आणि सात अर्धशतकांच्या मदतीने 1202 धावा केल्या. याशिवाय सलीम दुर्रानीनेही आपल्या कारकिर्दीत 75 विकेट घेतल्या. सलीम दुर्रानी अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय क्रिकेटर होते.
सलीम दुर्रानी यांनी ‘चरित्र’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात सलीम यांच्यासोबत परवीन बॉबी होती. पण हा चित्रपट फार चालला नाही. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सलीम दुर्रानी यांचे निधन झाले. ते दीर्घकाळ आजारी होते आणि कर्करोगासारख्या जटील आजाराशी झुंज देत होते. गुजरातमधील जामनगर येथे वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
