वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने 5 धावांत घेतल्या 4 विकेट, मोडला भारतीय खेळाडूचा विक्रम, 46 वर्षांनंतर कसोटीत असे झाले


किंग्स्टनमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या एका गोलंदाजाने इतकी धारदार गोलंदाजी केली की, विक्रम मोडला गेला. क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये गेल्या 46 वर्षात घडलेली अशी पहिलीच घटना होती. त्याने केलेल्या कहराचा परिणाम असा झाला की बांगलादेश संघ दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 200 धावांचा टप्पा गाठण्यापासून खूप दूर राहिला. त्यामुळे यजमान वेस्ट इंडिजला सामन्यावर ताबा मिळवण्याची संधी मिळाली. ज्या खेळाडूमुळे वेस्ट इंडिज संघ दुसऱ्या कसोटीत मजबूत स्थितीत आहे, तो म्हणजे जायडेन सील्स, ज्याने भारतीय गोलंदाजाचा विक्रम मोडून बांगलादेशविरुद्ध इतिहास रचला आहे.

जायडेन सील्सने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावात 15.5 षटके टाकली, 10 मेडन्स टाकल्या आणि 5 धावांत 4 बळी घेतले. या कालावधीत, त्याची इकोनॉमी 0.31 होती, जी 1978 नंतर पुरुषांच्या कसोटी क्रिकेटमध्ये नोंदलेली सर्वोत्तम इकोनॉमी आहे. याआधी हा विक्रम भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या नावावर होता, ज्याने 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत 0.42 च्या इकॉनॉमीसह गोलंदाजी केली होती. उमेशने 21 षटकांत 16 मेडन्स टाकल्या आणि 9 धावांत 3 बळी घेतले. पण उमेशचा हा विक्रम आता जायडेन सील्सने मोडला आहे.

त्याचा बळी ठरलेल्या बांगलादेशच्या फलंदाजांमध्ये लिटन दास, तस्किन अहमद, मेहदी हसन आणि नाहिद राणा यांचा समावेश आहे. गोलंदाजीत जायडेन सील्सला शेमार जोसेफ आणि केमार रोचचीही पूर्ण साथ मिळाली. परिणामी बांगलादेशचा संघ पहिल्या डावात केवळ 164 धावा करून बाद झाला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजनेही पहिल्या डावात दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 बाद 70 धावा केल्या होत्या. म्हणजे यजमान वेस्ट इंडिज आता फक्त 94 धावांनी मागे आहे आणि त्यांच्या 9 विकेट शिल्लक आहेत. अशा स्थितीत बांगलादेशला सामन्यात पुनरागमन करायचे असेल, तर वेस्ट इंडिजचे 9 विकेट झटपट पाडण्याचे नियोजन करावे लागेल. वेस्ट इंडिजने पहिली कसोटी 201 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकली. आता जर त्यांनी दुसरी कसोटीही जिंकली, तर ते कसोटी मालिकेवर कब्जा करतील.