
एड्सबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. एड्सबद्दल जनजागृती करणे, एड्स आणि एचआयव्हीमधील फरक समजावून सांगणे आणि या आजाराशी लढण्यासाठी लोकांना सर्व माहिती देणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. एड्स हा अनेक दशके जुना आजार आहे, परंतु आजपर्यंत त्याला रोखण्यासाठी कोणतीही लस विकसित झालेली नाही. एड्स हा आजार काय आहे? एड्स आणि एचआयव्हीमध्ये काय फरक आहे आणि आजपर्यंत एचआयव्ही रोखण्यासाठी लस का बनवण्यात आलेली नाही, हे जाणून घेऊया.
World AIDS Day 2024 : अनेक दशके जुना आहे एड्सचा आजार, आजपर्यंत का तयार झाली नाही लस ?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सर्वप्रथम एड्स आणि एचआयव्हीमधील फरक जाणून घ्यावा लागेल. एड्स (अक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम) होतो. हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती जवळजवळ कोलमडते आणि शरीर अगदी कमी संसर्ग आणि रोगाशी देखील लढू शकत नाही. अशा स्थितीत व्यक्तीचा मृत्यू होतो. एचआयव्ही आणि एड्समध्ये खूप फरक आहे. एचआयव्ही हा विषाणू आहे. एचआयव्हीचा अर्थ असा नाही की एखाद्याला एड्स आहे. एचआयव्ही विषाणूचा शेवटचा टप्पा म्हणजे एड्स.
एचआयव्हीची लागण झाल्यानंतर एआरटी उपचार सुरू केले, तर कोणतीही व्यक्ती सामान्य जीवन जगू शकते. या उपचाराने एचआयव्ही विषाणूला एड्समध्ये विकसित होण्यापासून रोखता येऊ शकते. या उपचाराने लाखो रुग्ण आपले सामान्य जीवन जगत आहेत.
एचआयव्ही विषाणू हा अतिशय वेगळ्या प्रकारचा विषाणू आहे. त्याच्या संरचनेत सतत बदल होत असतात. हा विषाणू रोगप्रतिकारक शक्तीला सहज फसवतो. एचआयव्ही विषाणूचे उत्परिवर्तन देखील इतर कोणत्याही विषाणूंपेक्षा जास्त असते. यामुळे, एचआयव्ही विरूद्ध लस बनवता येत नाही.
दुसरी मोठी समस्या अशी आहे की जर एचआयव्ही विषाणूविरूद्ध लस तयार केली गेली, तर ती रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करू शकेल का? याबाबत फारशी आशा वाटत नाही आणि ही लस कितपत प्रभावी ठरेल, याबद्दल काहीही सांगता येत नाही. यामुळेच आजपर्यंत एचआयव्हीची लस तयार झालेली नाही. शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून प्रयत्न करत असले तरी, काहीतरी चांगले घडेल अशी आशा आहे. गेल्या दशकात जगभरात एचआयव्हीचे रुग्ण सातत्याने कमी होत आहेत, ही दिलासादायक बाब आहे.
एड्सची लक्षणे कोणती?
- नेहमी सौम्य ताप येणे
- वजन कमी होणे
- डोकेदुखी आणि स्नायू दुखणे
- त्वचेवर पुरळ उठणे
- तोंडाचा व्रण
- झोपेची समस्या
एड्स कसा रोखायचा
- सुरक्षित शारिरीक संबंध ठेवा
- अंमली पदार्थ टाळा
- टॅटू काढताना, नवीन सुई वापरल्याची खात्री करा.
- लक्षणे दिसल्यास एचआयव्हीची चाचणी घ्या
- या आजाराबाबत जागरूक रहा
