जर्मनीतून एक चांगली बातमी येत आहे, बर्टेल्समन स्टिफटंगच्या अहवालानुसार, जर्मनीला दरवर्षी 2 लाख 88 हजार कामगारांची गरज भासेल. खरं तर, जर्मनीमध्ये वाढत्या वयामुळे कामगारांची कमतरता आहे, त्यामुळे जर्मनीला परदेशी स्थलांतरित कामगारांवर अवलंबून राहावे लागते.
जर्मनीमध्ये कामच काम, नोकरीसाठी आहे 2 लाख 88 हजार लोकांची गरज
या अहवालानुसार, कामगार शक्ती टिकवण्यासाठी जर्मनीला 2040 पर्यंत दरवर्षी सरासरी 2 लाख 88 हजार कामगारांची आवश्यकता असेल. या अहवालात असेही म्हटले आहे की, विशेषत: महिला आणि वृद्ध कामगारांमध्ये लक्षणीय वाढ न झाल्यास, जर्मनीला दरवर्षी 3 लाख 68 हजार स्थलांतरितांची गरज भासू शकते.
जर्मनीतील कामगारांची वाढलेली मागणी सन 2000 ची आठवण करून देणारी आहे, गेल्या दशकात सीरिया आणि युक्रेनमधील संघर्षामुळे जर्मनीतील स्थलांतराचे प्रमाण 6 लाखांवर पोहोचले होते आणि त्याचा परिणाम जगभरातील कामगार बाजारावर दिसून आला.
जर्मनीतील कामगारांच्या वाढत्या मागणीमागे अनेक कारणे आहेत, सर्वात मोठे कारण म्हणजे तेथील मोठ्या लोकसंख्येचे वृद्धत्व आणि निवृत्तीचे वय जवळ आले आहे. यासह, बेबी बूमर्स पिढी (1946 ते 1964 या काळात जन्मलेले लोक) कर्मचारी वर्गातून बाहेर पडत आहेत. त्यामुळे जर्मनीतील कामगारांची संख्या झपाट्याने कमी होत आहे आणि त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे.
जर्मनीत पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत, अशा परिस्थितीत स्थलांतरित कामगारांचा मुद्दा जर्मनीत तापला आहे. या कारणास्तव डाव्या पक्षांसह राजकीय पक्ष निर्वासितांची वाढती संख्या मर्यादित करण्याची मागणी करत आहेत. दुसरीकडे, Bertelsmann Stiftung येथील स्थलांतर तज्ज्ञ सुझान शुल्ट्झ यांनी ब्लूमबर्गला सांगितले की, बेबी बूमर्सच्या निवृत्तीमुळे जर्मनीमध्ये कामगारांची कमतरता वाढणार आहे, ज्यामुळे स्थलांतरित कामगारांची मागणी वेगाने वाढेल.
जर्मनीची आर्थिक स्थिरता आणि वाढीची शक्यता परदेशी कामगारांना आकर्षित करू शकते आणि त्यांना जर्मनीमध्ये राहण्यास मदत करू शकते, परंतु स्थलांतरितांची वाढती संख्या येत्या काही दिवसांत सामाजिक आणि राजकीय विरोधामध्ये चर्चेत राहू शकते.