71 फ्रीज आणि 11 टीव्ही तोडले… पगार न वाढवल्याने मॉल कर्मचाऱ्याने घेतला असा बदला


मध्य प्रदेशातील बैतुल येथील एका शॉपिंग मॉलमध्ये एका कर्मचाऱ्याने आपल्या बॉसचा बदला घेण्यासाठी मॉलमधील सामानाचे प्रचंड नुकसान केले. कर्मचाऱ्याने सुमारे 18 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली, ज्यामध्ये कर्मचारी शॉपिंग मॉलच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागात डिस्प्लेसाठी ठेवलेला एलईडी टीव्ही आणि फ्रीजचे नुकसान करताना दिसत आहे.

या घटनेत आरोपी कर्मचारी कमल पवार याने शॉपिंग मॉलमधील इलेक्ट्रॉनिक विभागात ठेवलेल्या सामानाचे नुकसान केले. त्याने एकामागून एक 11 टीव्ही स्क्रीन फोडल्या. यानंतर त्याने रेफ्रिजरेटर विभागात जाऊन 71 रेफ्रिजरेटरचे नुकसान केल्याचे मॉलमधील इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले असता, हे काम बाहेरील कोणी नसून मॉलच्याच कर्मचाऱ्यांनी केल्याचे समोर आले आले.

मॉल कर्मचारी कमल पवार याने त्याच्या मॉल ऑपरेटरकडे दिवाळीपूर्वी पगारवाढीची मागणी केली होती, मात्र त्याची मागणी पूर्ण न झाल्याने त्याने संतप्त होऊन तीन दिवसांची रजा घेतली. त्यानंतर परतल्यानंतर त्याने मॉलमध्ये हे कृत्य केले. याप्रकरणी मॉलचे व्यवस्थापक संजय गुप्ता यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मॉलमधील मालाचे नुकसान केल्याप्रकरणी कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती, मात्र आरोपीने मानसिक स्थितीचे कारण देत जामीन मिळवला होता. आता पोलीस पुढील कारवाईत व्यस्त आहेत.

या संपूर्ण प्रकरणाबाबत कोतवाली टीआय रविकांत देहरिया सांगतात की, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर आणि मॉल ऑपरेटरने या घटनेची तक्रार केल्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात आली. या घटनेबाबत मॉलचे व्यवस्थापक संजय गुप्ता सांगतात की, त्यांचाच कर्मचारी अशी घटना घडवून आणू शकतो, असे त्यांना कधीच वाटले नव्हते. आता त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते टीव्ही आणि फ्रीज सारख्या खराब झालेल्या विद्युत उपकरणांची विक्री करणे, ज्यांची किंमत सुमारे 18 लाख रुपये आहे.