जर दोन उमेदवारांना समान मते मिळाली, तर कोण होणार विजयी? जाणून घ्या कसा घेतला जातो निर्णय आणि कोणाला आहे विजेता घोषित करण्याचा अधिकार


मतमोजणीच्या दिवशी एका जागेवर दोन उमेदवारांना समान मते मिळाली, तर त्यांच्यातील विजयी कोण असेल? विजेता कोण हे कसे ठरवले जाईल? हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्रथम बॅलेट पेपरच्या मतांची मोजणी केली गेली आणि नंतर ईव्हीएम मतांची मोजणी सुरु झाली आहे.

संध्याकाळपर्यंत दोन्ही राज्यात कोण जिंकले आणि कोण हरले याचे चित्र स्पष्ट होईल. एकाच जागेवर दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्यास काय होईल, विजयी कोण ठरवणार? ते आम्ही तुम्हाला सांगतो.

लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 64 नुसार मतमोजणी रिटर्निंग ऑफिसरच्या देखरेखीखाली केली जाते. या कलमामुळे निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला मतमोजणीदरम्यान त्याच्या पोलिंग एजंटला उपस्थित राहण्याचा अधिकार दिला जातो. मतमोजणीच्या वेळी दोन उमेदवारांना समान मते मिळाल्यावर लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 65 अन्वये निर्णय घेतला जातो. अशा परिस्थितीत निर्णय घेण्याची जबाबदारी निवडणूक अधिकाऱ्यांची असते. रिटर्निंग ऑफिसर लॉटरीद्वारे याचा निर्णय घेतात.

ज्या उमेदवारांमध्ये हे प्रकरण आहे, त्यांची नावे स्लिपवर लिहून बॉक्समध्ये टाकली जातात. पेटी हलवली जाते आणि रिटर्निंग ऑफिसर स्लिप काढतात. तिकिटाच्या स्लिपमध्ये ज्या उमेदवाराचे नाव दिसेल त्याला विजयी घोषित केले जाते. अशा प्रकारे समस्येवर उपाय सापडतो. लॉटरीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्याचे कायद्यात सांगितले जात असले, तरी ही लॉटरी केवळ स्लिपच्या माध्यमातूनच होणार हे स्पष्ट नाही. यासाठी नाणीही वापरता येतात. यापूर्वीही असे प्रकरण समोर आले होते. निवडणुकीत अशी परिस्थिती निर्माण झाली की नाण्यांचा वापर केला जायचा.

2018 साली झालेल्या सिक्कीमच्या पंचायत निवडणुकीतही अशीच स्थिती मतमोजणीदरम्यान समोर आली होती. जेव्हा 6 जागांवर नाण्यांद्वारे विजेते निवडले गेले. याठिकाणी उमेदवारांमध्ये बाचाबाचीची परिस्थिती होती. याशिवाय फेब्रुवारी 2017 मध्ये बीएमसी निवडणुकीतही हे घडले होते. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अतुल शहा आणि शिवसेनेचे उमेदवार सुरेंद्र यांच्यात चुरशीची लढत झाली होती. दोघांनाही समसमान मते मिळाली. अशा स्थितीत एका व्यक्तीला विजयी घोषित करण्यासाठी पुन्हा मतमोजणी करण्यात आली. मात्र, तरीही निकाल बरोबरीतच राहिला. यानंतर लॉटरीद्वारे निर्णय घेण्यात आला आणि अतुल शहा यांना विजयी घोषित करण्यात आले. अशा प्रकारे या समस्येवर उपाय सापडला. मात्र, अशी परिस्थिती कुठेतरी निर्माण झाली आहे का, हे शनिवारी सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल.