‘कांगुवा’ फ्लॉप होताच सूर्याला मिळाली वाईट बातमी! बंद झाला 350 कोटींचा चित्रपट


तामिळ सुपरस्टार सूर्या आता चेन्नईहून मुंबईत शिफ्ट झाला आहे. सूर्या मुंबईत येण्यामागे मुलांच्या शिक्षणाचे कारण सांगत असला, तरी या तमिळ अभिनेत्याला आता बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असल्याचे बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या ‘कांगुवा’च्या पत्रकार परिषदेत सूर्याला त्याच्या ‘कर्ण’ चित्रपटाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने सांगितले की, सध्या त्याबद्दल काहीही निश्चित नाही, पण त्याची देहबोली वेगळीच गोष्ट सांगत होती. दरम्यान, ‘कर्ण’ची वाट पाहणाऱ्या सूर्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. जान्हवी कपूर आणि सूर्या यांचा 350 कोटींचा पॅन इंडिया चित्रपट आता थांबला आहे.

ओमप्रकाश मेहराचा ड्रीम प्रोजेक्ट ‘कर्ण’ फरहान अख्तरची प्रोडक्शन कंपनी एक्सेल एंटरटेनमेंट बनवणार आहे. सुमारे 350 कोटींच्या मेगा बजेट असलेल्या या चित्रपटात सूर्या सूर्यपुत्र कर्णाची भूमिका साकारणार होता, तर जान्हवी या चित्रपटात द्रौपदीची भूमिका साकारणार होती. यापुर्वीही मोठ्या बजेटमुळे प्री-प्रॉडक्शन सुरू होऊनही हा प्रोजेक्ट बंद पडला होता. मात्र पुन्हा एकदा या टीमने चित्रपटावर काम सुरू केले. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘कांगुवा’ फ्लॉप झाल्यानंतर हा चित्रपट पुन्हा रखडला आहे. तथापि, अद्याप या संदर्भात कलाकार किंवा प्रॉडक्शनकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

केवळ जान्हवी कपूर आणि सूर्याच नाही, तर इंडस्ट्रीतील आणखी काही मोठी नावेही या चित्रपटाशी जोडली गेली होती. या चित्रपटात विजय वर्मा, अली फजल आणि अविनाश तिवारी मुख्य भूमिकेत दिसणार होते. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनवर आतापर्यंत 15 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आता ‘रंग दे बसंती’सारखा सुपरहिट चित्रपट बनवणाऱ्या राकेश ओमप्रकाश मेहराचे ‘कर्ण’वर चित्रपट बनवण्याचे स्वप्न अधुरे राहिल का?, की ते इतर प्रोडक्शन हाऊससोबत हा चित्रपट बनवण्यास ते राजी होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.