
टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी शानदार प्रदर्शन करून केएल राहुल आणि सरफराज खान यांना टेंशनमध्ये टाकले आहे. ध्रुव जुरेलला 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध खेळण्यासाठी मेलबर्नला पाठवण्यात आले. मिळालेल्या संधीचा फायदा घेत त्याने या अनधिकृत कसोटीच्या दोन्ही डावांत अर्धशतके झळकावून आपला दावा पक्का केला. जुरेलनेही सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ही दोन्ही अर्धशतके केली. राहुल आणि सरफराजही याच क्रमांकावर फलंदाजी करतात.
सरफराज-राहुलसाठी धोका? ऑस्ट्रेलियात एकाच सामन्यात 2 अर्धशतके झळकावणारा हा खेळाडू धेणार जागा हिसकावून
मेलबर्न येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारत अ संघाला 6 विकेटने पराभव स्वीकारावा लागला. पण या सामन्यात ध्रुव जुरेलची खेळी ही भारतीय संघासाठी सर्वात सकारात्मक बाजू होती. त्याची खेळी पाहून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांचा तणाव थोडा कमी होईल. कारण जुरेल ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध दोन्ही डावांत एकटाच लढत राहिला. त्याच्यामुळेच संघाची इज्जत वाचली.
पहिल्या डावात भारत अ संघाने केवळ 11 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतर त्याने 186 चेंडूत 80 धावांची धडाकेबाज खेळी करत भारतीय संघाला 150 च्या पुढे नेले. दुसऱ्या डावात भारतीय संघाने 44 धावांवर 4 विकेट गमावल्या. यानंतर त्याने 122 चेंडूंचा सामना करत 68 धावा केल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर संघाला पुन्हा 150 पर्यंत मजल मारता आली आणि शेवटी गोलंदाजांनी 229 पर्यंत सन्मानजनक धावसंख्या गाठली. याआधीही त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दडपणाखाली सामना जिंकला होता.
ध्रुव जुरेलच्या दोन्ही डावांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याने दडपण सहन करत संघाला संकटातून बाहेर काढले. एका टोकाकडून विकेट पडत राहिल्या पण दुसऱ्या टोकाला तो ठाम उभा राहिला. संघाचे प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर त्याने गोलंदाजांसह डाव पुढे नेला. संपूर्ण सामन्यात भारत अ संघाने एकूण 810 चेंडूंचा सामना केला, त्यापैकी एकट्या जुरेलने 308 चेंडू खेळले.
जुरेलला असा एकटा लढताना पाहून समालोचकही त्याचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत आणि त्याची तुलना विराट कोहलीशी केली. ऑस्ट्रेलियामध्ये सतत विकेट्स गमावून डाव फसण्याची भीती असते. अशा स्थितीत सहाव्या क्रमांकावर भारतीय संघाला अशा फलंदाजाची गरज आहे, जो दबाव सहन करू शकेल आणि खालच्या क्रमाने फलंदाजी करण्यात पटाईत असेल.
