वनडेतील नंबर 1 अष्टपैलू खेळाडूने घेतला धक्कादायक निर्णय, या टूर्नामेंटनंतर हा 39 वर्षीय दिग्गज घेणार निवृत्ती


अफगाणिस्तानचा अनुभवी क्रिकेटपटू मोहम्मद नबी पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. नबी सध्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने 2009 मध्ये स्कॉटलंडविरुद्ध वनडेमध्ये पदार्पण केले आणि गेल्या 15 वर्षांपासून तो अफगाणिस्तानकडून या 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळत आहे. 39 वर्षीय नबीने 5 वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, मोहम्मद नबी अफगाणिस्तानकडून टी-20 क्रिकेट खेळत राहणार आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नसीब खान यांनी मोहम्मद नबीच्या निवृत्तीचा खुलासा केला आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, नबीने एसीबीला आपल्या निवृत्तीच्या निर्णयाची माहिती दिली आहे, जी बोर्डानेही मान्य केली आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो 2026 टी-20 विश्वचषकापर्यंत खेळू शकतो. नसीब खान म्हणाले की, नबीने मला काही महिन्यांपूर्वी सांगितले होते की, त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वनडे करिअर संपवायचे आहे आणि आम्ही त्याच्या निर्णयाचे स्वागत करतो.

मोहम्मद नबी हा अफगाणिस्तानच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. उजव्या हाताने फलंदाजी करण्याव्यतिरिक्त, तो ऑफ-स्पिन गोलंदाजी देखील करतो आणि अनेक विजयांमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. आहे. नबी सध्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू आहे. बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात, 71 धावांवर 5 विकेट गमावल्यानंतर, त्याने 79 चेंडूत 84 धावांची शानदार खेळी केली आणि संघाच्या विजयाचा हिरो ठरला.

मोहम्मद नबीने 2009 मध्ये स्कॉटलंडविरुद्ध पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावून आपली प्रतिभा दाखवली. या सामन्यात त्याने 8 षटकेही टाकली. मात्र, त्याला एकही विकेट घेता आली नाही. तेव्हापासून आपल्या 15 वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत नबीने अफगाणिस्तानसाठी एकूण 165 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 27.30 च्या सरासरीने 3549 धावा केल्या आहेत आणि 171 विकेट्सही घेतल्या आहेत.