रोहित शर्मा-विराट कोहली करू शकणार नाहीत ऑस्ट्रेलियात धावा, मायकेल वॉनने चोळले जखमेवर मीठ


विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचेही दिवस सध्या चांगले नाहीत. या दोन्ही फलंदाजांची बॅट शांत आहे. बांगलादेशविरुद्ध ना त्यांना धावा करता आल्या, ना न्यूझीलंडविरुद्ध काही करता आले, परिणामी आता या दोघांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता विराट-रोहितच्या चाहत्यांना आशा आहे की हे खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर परततील आणि धावा काढतील, पण इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनला तसे वाटत नाही. विराट आणि रोहित ऑस्ट्रेलियातही फॉर्ममध्ये परतणार नाहीत, असे वॉनचे मत आहे.

फॉक्स क्रिकेटवरील संवादादरम्यान मायकेल वॉन म्हणाला की, जर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियामध्ये जिंकायचे असेल, तर रोहित आणि विराट कोहलीला मोठ्या धावा कराव्या लागतील आणि त्यांच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परत यावे लागेल. वॉन पुढे म्हणाला की, मला आशा आहे की असे होईल, पण असे होणार नाही याची भीती वाटते. ऑस्ट्रेलियात कांगारू गोलंदाजांविरुद्ध तुम्हाला ठोस तंत्र आणि उत्कृष्ट विचाराने मैदानात उतरावे लागेल, असे वॉन म्हणाला.

मायकेल वॉन पुढे म्हणाला, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात झालेली शेवटची कसोटी मालिका जिंकली, जेव्हा संघाने गाब्बा येथे पाठलाग केला, त्यावेळी विराटही तिथे नव्हता. ऑस्ट्रेलिया 32 वर्षांपासून गाबा येथे हरले नव्हते, परंतु मला असे म्हणायचे आहे की विराट कोहलीची समस्या अधिक आहे. विराटने सँटनरचा फुल टॉस बॉल ज्या प्रकारे चुकवला, विराट कोहली पूर्वीसारखा दिसत नाही.