
नीता अंबानी यांचा आज 60 वा वाढदिवस आहे आणि या वयातही त्या बऱ्यापैकी सक्रिय आणि फिट आहेत. त्या आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पत्नी आहेत, पण ही त्यांची एकमेव ओळख नाही. किंबहुना, त्या स्वतःच्या अधिकारातही एका मोठ्या साम्राज्याच्या मालकीण आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये अशी अनेक कामे आहेत, जिथे त्यांच्या मर्जीशिवाय पानही हलत नाही.
Nita Ambani Birthday Special : नीता अंबानी यांचे आहे स्वतःचे एवढे मोठे साम्राज्य
नीता अंबानी यांच्या वैयक्तिक कारकिर्दीवर नजर टाकली, तर मुकेश अंबानींशी लग्न केल्यानंतरही त्या केवळ 800 रुपयांत काम करत होत्या. त्या एका शाळेत शिक्षिका होत्या. त्यांची शिक्षणाची आवड नंतरही कायम राहिली. यामुळे 2003 मध्ये त्यांनी ‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ सुरू केले. येथूनच त्यांच्या स्वत:च्या साम्राज्याची निर्मिती सुरू होते.
रिलायन्सचा ‘सामाजिक’ चेहरा
नीता अंबानी आज रिलायन्स इंडस्ट्रीजचा सामाजिक चेहरा आहेत. त्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) शाखा रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा आहेत. रिलायन्स फाऊंडेशन शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, क्रीडा, सांस्कृतिक संपर्क आणि आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात काम करते.
क्रीडाविश्वातील मोठे नाव
नीता अंबानी यांना ‘फर्स्ट लेडी ऑफ स्पोर्ट्स’ असेही संबोधले जाते. त्या आयपीएल संघ मुंबई इंडियन्सच्या सहमालक आहेत. आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघांपैकी हा एक आहे. अलीकडेच त्यांना ऑलिम्पिक समितीचे सदस्यही बनवण्यात आले होते. या समितीत सामील झालेल्या त्या पहिल्या भारतीय आहेत. भारतात फुटबॉलच्या पुनरुज्जीवनाचे श्रेयही नीता अंबानी यांना जाते. इंडियन सुपर लीगच्या त्या संस्थापक अध्यक्षा आहेत.
सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या नीता
नीता अंबानींचे साम्राज्य येथेच थांबत नाही. अलीकडेच पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ‘इंडिया हॉल’च्या मदतीने भारतीय संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रचार केला. भारतीय हस्तकलेचा प्रचार करणारा ‘स्वदेशी ब्रँड’ पूर्णपणे नीता अंबानींचा ब्रेन चाइल्ड आहे. नीता अंबानी यांनीही त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नात भारतीय संस्कृतीचा पुरस्कार केला आहे. तर मुंबईतील ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ देखील त्यांच्या साम्राज्याचा एक भाग आहे.
मुलांसाठी सोडली संचालक मंडळाच्या सदस्याची खुर्ची
नीता अंबानी दीर्घकाळ रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाच्या सदस्या राहिल्या. पण गेल्या वर्षी ऑगस्ट 2023 मध्ये, जेव्हा त्यांची तीन मुले ईशा, आकाश आणि अनंत यांचा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला, तेव्हा नीता अंबानींनी त्यांची स्वतःची खुर्ची सोडली. मात्र, कंपनीने नीता अंबानी यांना बोर्डाच्या सर्व बैठकांना कायमस्वरूपी पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.
नीता अंबानींच्या साम्राज्यात यांचाही आहे समावेश
इतकेच नाही, तर वायकॉम 18 आणि स्टार इंडियाच्या विलीनीकरणानंतर स्थापन झालेली नवी कंपनी लवकरच नीता अंबानींच्या साम्राज्यात सामील होणार आहे. त्या नव्या कंपनीच्या संभाव्य अध्यक्षा असतील. याशिवाय त्यांनी भारतीय महिलांसाठी ‘हर सर्कल’ नावाची डिजिटल चळवळ सुरु केली आहे. हे महिलांना एकमेकांशी जोडण्यासाठी एक सामाजिक व्यासपीठ प्रदान करते.
जामनगर रिफायनरीच्या कचराभूमीचे धीरूभाई अंबानी अमराई उद्यानात रूपांतर करून अँटिलियाला देशातील नामवंतांचे दुसरे घर बनवण्याचे कामही नीता अंबानी यांनी केले आहे.
