Emerging Asia Cup : रमणदीपची खेळीही आली नाही कामी, अफगाणिस्तान अ संघाने उपांत्य फेरीत केला भारत अ संघाचा पराभव


सर्वांना आश्चर्यचकित करत टीम इंडिया इमर्जिंग टीम एशिया कप 2024 मध्ये अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरली आहे. ओमानमध्ये खेळल्या जात असलेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत अ संघाला अफगाणिस्तान अ संघाकडून 20 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मस्कत येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तान अ संघाने प्रथम फलंदाजी करत स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या म्हणजे 206 धावा केल्या. प्रत्युत्तरात रमणदीप सिंगची 64 धावांची उत्कृष्ट खेळीही टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकली नाही आणि भारतीय संघ केवळ 186 धावाच करू शकला. यासह गतवर्षीच्या स्पर्धेतील अंतिम फेरीतील दोन्ही संघ उपांत्य फेरीतच पराभूत होऊन बाहेर पडले. पहिल्या उपांत्य लढतीत श्रीलंका अ संघाने पाकिस्तान शाहीनचा 7 गडी राखून पराभव केला होता.

अफगाणिस्तान अ संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि त्याच्या सलामीवीरांनी संघासाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता. सादिकुल्ला अटल आणि झुबैद अकबरी यांनी येताच आक्रमक शैली दाखवत टीम इंडियाच्या प्रत्येक गोलंदाजावर हल्ला चढवला. या दोघांनी पॉवरप्लेमध्येच 61 धावा केल्या होत्या आणि 12 व्या षटकापर्यंत संघाने 100 धावांचा टप्पा ओलांडला होता. यानंतर, 13 व्या षटकात त्यांनी खळबळ उडवून दिली, टीम इंडियासाठी टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळलेला लेगस्पिनर राहुल चहरच्या या षटकात दोघांनी मिळून 4 षटकार ठोकले आणि एकूण 31 धावा केल्या. या षटकात राहुलने 2 नो बॉल टाकून स्वतःच्या आणि भारत अ संघाच्या अडचणी वाढवल्या.

या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली. जुबैदने 64 धावांची तर अटलने 83 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. मात्र, रसिक सलाम दारने एकाच षटकात 2 बळी घेत टीम इंडियाचे पुनरागमन केले. तर, अनुभवी अफगाणिस्तानचा अष्टपैलू करीम जनातने शेवटच्या षटकांमध्ये अवघ्या 20 चेंडूत 41 धावा करत संघाला 206 धावांपर्यंत नेले. या स्पर्धेत प्रथमच एखाद्या संघाने 200 धावांचा टप्पा ओलांडला होता.

हे मोठे लक्ष्य गाठण्यासाठी भारतीय संघाला प्रभसिमरन सिंग (19) आणि अभिषेक शर्मा (7) या सलामीवीरांकडून दमदार सुरुवातीची अपेक्षा होती, जी मागील सामन्यांमध्ये दिसून आली होती, परंतु या सामन्यात तसे होऊ शकले नाही. अभिषेक तिसऱ्याच षटकात बाद झाला. प्रभासिमरननेही काही चांगले फटके मारले, मात्र तोही पाचव्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला, तर कर्णधार तिलक वर्मा (16)ही अपयशी ठरला. यानंतर आयुष बडोनी (31) आणि नेहल वढेरा (20) यांनी छोटीशी भागीदारी केली, पण ते दोघेही 13व्या षटकात 100 धावा झाल्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले.

पाच गडी बाद झाल्यानंतर पराभव निश्चित वाटत होता, पण येथे रमणदीप सिंगने आपल्या स्फोटक खेळीने पुनरागमनाच्या आशा उंचावल्या. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या रमणदीपने रिटेन्शन डेडलाइनच्या अवघ्या 6 दिवस आधी आपली क्षमता दाखवली, चौकार ठोकले आणि अवघ्या 26 चेंडूत अर्धशतकही झळकावले. रमणदीप आणि निशांत सिंधू (23) यांच्यात 31 चेंडूत 68 धावांची उत्कृष्ट भागीदारी झाली, पण ती निशांतच्या धावबादमुळे तुटली आणि यासह भारत अ संघाच्या पुनरागमनाच्या आशाही संपुष्टात आल्या. भारतीय संघ 20 षटकांत केवळ 186 धावा करू शकला.