खराब कामगिरीमुळे पाकिस्तानच्या कसोटी संघातून बाहेर असलेला स्टार फलंदाज बाबर आझमला इतर देशांचे चाहतेच नाही, तर त्याचे स्वतःचे चाहतेही सोडत नाहीत. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर संपूर्ण मालिकेतून वगळण्यात आले असले, तरी अनेक पाकिस्तानी चाहत्यांच्या मनात अजूनही बाबरबद्दल नाराजी आहे, ज्याचे दृश्य रावळपिंडी कसोटी सामन्यादरम्यान पाहायला मिळाले. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी, स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या काही चाहत्यांनी बाबर आझमला चिडवत घोषणाबाजी केली, जरी तो सामन्याचा भाग नसला तरीही. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सामन्यादरम्यान बाबर आझमला चिडवण्यासाठी करण्यात आली घोषणाबाजी, पाकिस्तानी चाहत्यांनी उडवली त्याची खिल्ली
कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवार 24 ऑक्टोबरपासून रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर सुरू झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंड संघाने फलंदाजीला सुरुवात केली. पाकिस्तानचे फिरकीपटू या सामन्यात धुमाकूळ घालत होते आणि इंग्लंडच्या विकेट घेत होते. दरम्यान, स्टँडमध्ये उपस्थित असलेल्या काही चाहत्यांनी बाबर आझमची खिल्ली उडवण्यासाठी त्याला चिडवत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही चाहत्यांचे आवाज ऐकू येतात. हे प्रेक्षक ‘झिंबाबर-झिंबाबर’च्या घोषणा देत आहेत.
खरे तर बाबर आझमला चिडवण्यासाठी सोशल मीडियावर अनेकदा हा शब्द वापरला गेला आहे. कारण बाबरने झिम्बाब्वेसह छोट्या संघांविरुद्धच धावा केल्याचा आरोप अनेक चाहते करत आहेत. असेही म्हटले जाते की जेव्हा जेव्हा एखादी मोठी टीम समोर असते किंवा वर्ल्ड कपसारखी मोठी स्पर्धा असते, तेव्हा पाकिस्तानला त्याची गरज असते, तेव्हा बाबर धावा करत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर टीका करणारे सर्वसामान्य चाहते बाबरवर याच नावाने प्रश्न उपस्थित करतात.
बाबर सध्या कुटुंबासह संघापासून दूर आहे. पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी तो परतण्याची शक्यता आहे. रावळपिंडी कसोटी सामन्याचा विचार केला तर, पाकिस्तानी संघ पहिल्या दिवशी सुरुवातीला मजबूत स्थितीत दिसला, पण दिवसअखेर तो स्वतःच अडचणीत सापडला. साजिद खान आणि नोमान अली या फिरकी जोडीने पुन्हा एकदा आपली जादू दाखवत इंग्लंडला अवघ्या 267 धावांत गुंडाळले, पण दिवसअखेर पाकिस्ताननेच 3 विकेट गमावल्या होत्या, तर स्कोअरमध्ये केवळ 73 धावांची भर पडली होती.