
रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीचे सामने बुधवार 18 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत. यामध्ये एलिट गटात उत्तर प्रदेश आणि हरियाणा यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात बांगलादेशला पराभूत करणारा रिंकू सिंग यूपीकडून खेळत आहे. दुसरीकडे, टीम इंडियात पुनरागमन करण्याचा मार्ग शोधत असलेला लेगस्पिनर युजवेंद्र चहल हरियाणाकडून खेळत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रिंकूने यूपीसाठी शानदार फलंदाजी करत 110 चेंडूत 89 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे आता चहलचे पुनरागमन कठीण झाले आहे. कारण त्याने त्याची जबरदस्त धुलाई केली.
युझवेंद्र चहलचे पुनरागमन झाले अवघड, रिंकू सिंगने केली अवस्था खराब, रणजी ट्रॉफीत कुटल्या इतक्या धावा
हरियाणा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हिमांशू राणा आणि धीरू सिंग यांच्या शतकी खेळीच्या जोरावर हरियाणा संघाने 453 धावा केल्या. यादरम्यान युजवेंद्र चहलने 152 चेंडूत 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. प्रत्युत्तरात यूपी संघाने 43 धावांत 3 विकेट गमावल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आला रिंकू सिंग. आपल्या बॅटची ताकद दाखवत त्याने 110 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 89 धावा केल्या.
रिंकूने कर्णधार आर्यन जुयालसोबत 157 धावांची भागीदारी करत संघाला बुडण्यापासून वाचवले. आपल्या डावात त्याने चहलच्या 20 चेंडूंचा सामना केला आणि 25 धावा केल्या. 11 षटके टाकल्यानंतर 57 धावा दिल्या. म्हणजे एकट्या रिंकूने त्याच्या चेंडूवर जवळपास निम्म्या धावा केल्या. चहलला एकही विकेट मिळाली नाही. अशा परिस्थितीत चमकदार कामगिरी करून संघात संधी शोधत असलेल्या चहलचे मनसुबे धुळीस मिळवले आहेत. चहल ऑगस्ट 2023 पासून म्हणजे जवळपास 1 वर्षापासून टीम इंडियासाठी एकही सामना खेळू शकलेला नाही.
रिंकू सिंगशिवाय यश दयालही त्याच्या संघाकडून खेळत होता. तोच यश दयाल ज्याच्या चेंडूवर रिंकूने आयपीएलमध्ये सलग 5 षटकार मारून चर्चेत आला होता. त्यानंतर दयाल डिप्रेशनमध्ये गेला होता. मात्र, गेल्या वर्षी त्याने शानदार पुनरागमन केले. दयालचीही नुकतीच टीम इंडियात निवड झाली होती. पण खेळण्याची संधी मिळाली नाही. आता त्याने रणजी ट्रॉफीमध्ये यूपीसाठी चांगली गोलंदाजी केली आहे. दयालने 17 षटकात 56 धावा देत 2 बळी घेतले.
या सामन्यात यूपीचा कर्णधार आर्यन जुयालनेही चमकदार कामगिरी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तो 196 चेंडूत 118 धावा करून नाबाद परतला. यादरम्यान त्याने 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. रिंकू आणि जुयालच्या शानदार खेळीनंतरही यूपी अडचणीत आहे. कारण 6 गडी गमावून केवळ 267 धावाच करू शकले असून अजूनही 186 धावांनी पिछाडीवर आहे.
