
रेल्वेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांना पुन्हा नोकरी मिळू शकते आणि त्यासाठी रेल्वे बोर्डाने योजनाही तयार केली आहे. वास्तविक, रेल्वे बोर्ड देशभरातील विविध झोनमध्ये 25 हजार पदांवर सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. रेल्वेतील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेला तोंड देण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरी दिली जाणार आहे. मात्र, त्यांना ही नोकरी तात्पुरती मिळणार आहे. रेल्वे बोर्डाच्या या योजनेअंतर्गत, 65 वर्षांखालील सेवानिवृत्त कर्मचारी पर्यवेक्षक आणि ट्रॅक मॅन इत्यादी पदांसाठी अर्ज करू शकतात.
Railway Jobs 2024 : निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, त्यांना पुन्हा मिळणार नोकऱ्या, 25 हजार पदांवर होणार भरती
रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या या नियुक्त्या दोन वर्षांसाठी केल्या जातील आणि त्यात सेवेच्या आधारे मुदतवाढही दिली जाऊ शकते. या भरतीची जबाबदारी सर्व रेल्वे झोनच्या महाव्यवस्थापकांची असेल. तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती वैद्यकीय तंदुरुस्ती आणि त्यांची रेल्वेतील गेल्या 5 वर्षातील कामगिरीच्या आधारावर केली जाऊ शकते. रेल्वे बोर्डाने आपल्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की, प्रथम अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे परफॉर्मन्स रेटिंग तपासले जाईल आणि त्यांच्याविरुद्ध कोणतेही शिस्तभंगाचे प्रकरण प्रलंबित नसल्याचेही पाहिले जाईल. त्यानंतरच त्यांना नियुक्ती मिळेल, मात्र त्यांच्याविरुद्ध कोणतेही खटले प्रलंबित असल्यास त्यांना कामावर घेतले जाणार नाही.
रेल्वे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळी मिळालेल्या मासिक पगारावर पुन्हा कामावर घेतले जाईल, परंतु त्यांची मूळ पेन्शन कमी केली जाईल. पगाराव्यतिरिक्त, त्यांना प्रवास भत्ता देखील मिळेल, ज्यामध्ये अधिकृत दौऱ्यांचा समावेश असेल. तथापि, असे कर्मचारी कोणतेही अतिरिक्त लाभ किंवा पगारवाढीसाठी पात्र असणार नाहीत.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, देशातील वाढत्या रेल्वे अपघात आणि कमी होत जाणारे कर्मचारी संख्या यामुळे रेल्वे बोर्डाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पुन्हा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर-पश्चिम रेल्वेमध्ये 10 हजार पदांवर जास्तीत जास्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. या संदर्भात रेल्वे बोर्डाचे म्हणणे आहे की, पर्यवेक्षकीय आणि इतर महत्त्वाच्या भूमिकेतील कर्मचाऱ्यांची तात्काळ गरज भागवण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती करणे आवश्यक आहे.
