इंग्लंडकडून लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानचा मोठा निर्णय, आता हा पंच करणार संघाची निवड


पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ माजली आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात संघाला एक डाव आणि 47 धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. आता पाकिस्तान क्रिकेट संघासाठी नवीन निवड समितीची घोषणा करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या निवड समितीमध्ये एका पंचाचाही समावेश करण्यात आला आहे.

एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील पाकिस्तान संघात राजीनाम्याची लाट सुरू आहे. अलीकडेच मोहम्मद युसूफने निवड समितीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी पीसीबीने त्याच्या बदलीची घोषणा केली नव्हती. अशा परिस्थितीत इंग्लंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर त्यांनी निवड समितीमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. आता अलीम दार, आकिब जावेद, असद शफीक, अझहर अली आणि हसन चीमा यांचा नव्या निवड समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

असद शफीक आणि हसन चीमा यांचा यापूर्वीही निवड समितीमध्ये समावेश करण्यात आला होता. आता या समितीत अलीम दार, आकिब जावेद आणि अझहर अली यांना स्थान मिळाले आहे. अलीम दार हे आयसीसीचे माजी एलिट पंच आहेत. त्यांनी जवळपास 19 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायरिंग केले आहे. अलीम दारने अलीकडेच देशांतर्गत क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली होती.

अलीम दार यांनी पुरुषांच्या विक्रमी 435 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचाची भूमिका बजावली होती. त्याच वेळी, आपल्या अंपायरिंग कारकिर्दीत अलीम दारने तीन वेळा डेव्हिड शेफर्ड ट्रॉफी जिंकली होती. 2007 आणि 2011 क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलमध्येही तो पंच होता. अलीम दार याने पाकिस्तानसाठी डोमेस्टिक क्रिकेटही खेळले आहे. दार याने 1986-98 पर्यंत 17 प्रथम श्रेणी सामने आणि 18 लिस्ट ए सामने खेळले. यानंतर त्याने अंपायरिंगमध्ये आपली कारकीर्द घडवली.

पाकिस्तान क्रिकेटसाठी गेली काही वर्षे अत्यंत वाईट गेली आहेत. मोठ्या स्पर्धांमध्ये संघ सतत फ्लॉप होत आहे. आता पाकिस्तानचा संघ देशांतर्गत सामन्यांमध्येही जिंकत नाही आहे. पाकिस्तानने 1341 दिवसांपासून घरच्या मैदानावर एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. त्याच वेळी, 2023 एकदिवसीय विश्वचषक आणि 2024 टी-20 विश्वचषकातील ग्रुप स्टेजमधून देखील ते बाहेर पडले. अशा परिस्थितीत पाकिस्तान क्रिकेटमध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहेत, मात्र त्यांच्या खेळात कोणताही बदल झालेला नाही.