
इंग्लंडचा क्रिकेट संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना मुलतान स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याचा पहिला दिवस पाकिस्तानच्या नावावर होता. सपाट खेळपट्टीवर पाकिस्तानच्या फलंदाजांनी भरपूर धावा केल्या. पण या सपाट खेळपट्टीवरही संघाच्या माजी कर्णधाराला मोठी खेळी खेळता आली नाही आणि त्याचा खराब फॉर्म अजूनही कायम आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात बाबर आझम अशा गोलंदाजाच्या चेंडूवर झाला, ज्या 2016 सालापासून आशिया खंडात अखेरचा कसोटी बळी घेतला होता.
2858 दिवस विकेटसाठी आसुसलेल्या गोलंदाजाने केले बाबरला आऊट, गेल्या वेळी त्याने विराटला बनवला होता आपला बळी
बाबर आझम गेल्या काही काळापासून फारच खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याच्या बॅटमधून एकही मोठी खेळी पाहायला मिळालेली नाही. पण मुलतानची सपाट खेळपट्टी पाहून बाबर या सामन्यात मोठी खेळी खेळू शकेल असा विश्वास वाटत होता. पण तो 71 चेंडूत केवळ 30 धावा करू शकला आणि त्याची विकेट गेली. बाबर आझमला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने एलबीडब्ल्यू आऊट केले. बाबरने डीआरएस घेतला, पण तो क्लीन आऊट होता.
ख्रिस वोक्ससाठी ही विकेट खूपच खास होती. वास्तविक, ख्रिस वोक्सने 2858 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आशियामध्ये कसोटी विकेट घेतली. याआधी, 2016 मध्ये भारत दौऱ्यात त्याने आशियातील शेवटची कसोटी विकेट घेतली होती. त्यावेळी ख्रिस वोक्सने विराट कोहलीची विकेट घेतली. आता 8 वर्षांनंतर ख्रिस वोक्सने बाबरला बाद करून ही प्रतीक्षा संपवली आहे.
आजकाल बाबर आझमसाठी कसोटीत शतक तर सोडाच, अर्धशतक पूर्ण करणे हे स्वप्नच बनले आहे. तो गेल्या 1 किंवा 2 डावांपासून नाही, तर गेल्या 17 डावांपासून फ्लॉप ठरला आहे. बाबर आझमने कसोटीच्या शेवटच्या 17 डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावलेले नाही. त्याने नुकतेच एकदिवसीय आणि टी-20 संघाचे कर्णधारपदही सोडले आणि त्याला आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करायचे असल्याचे सांगितले. मात्र या सामन्याच्या पहिल्या डावात असे काही दिसले नाही.
कर्णधार शान मसूद आणि अब्दुल्ला शफीक यांच्या शतकांच्या जोरावर पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी चार विकेट्सवर 328 धावा करून आपली स्थिती मजबूत केली. खेळाच्या दुसऱ्या दिवशी या धावसंख्येमध्ये जास्तीत जास्त धावा जोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असेल. चार वर्षांतील पहिले कसोटी शतक झळकावताना मसूदने 177 चेंडूत 151 धावा केल्या, तर सलामीवीर शफीकने 102 धावांची खेळी केली. या दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी 253 धावांची मोठी भागीदारी केली. दिवसाचा खेळ संपला, तेव्हा सौद शकील 35 धावांवर खेळत असताना नाईट वॉचमन नसीम शाहने अद्याप खाते उघडलेले नाही. त्याचवेळी, इंग्लंडसाठी गस ऍटकिन्सनने पहिल्या दिवशी सर्वाधिक 2 बळी घेतले. त्याचवेळी जॅक लीचलाही 1 यश मिळाले.
